आपल्या मुलांची नावं काहीतरी युनिक असावीत या अट्टाहासामुळे पालक नवनवीन नावांचा शोध घेतात किंवा आईवडिलांच्या नावाला साधर्म्य अशी नावं शोधतात. बऱ्याचदा हे फॅड शहरी भागात पाहायला मिळत होते मात्र आता ग्रामीण भागातही लोक आपल्या मुलांसाठी युनिक नावं शोधू लागली आहेत. काही नावं तर उच्चार करायला इतकी अवघड जातात की त्याला नेमकं काय म्हणायचं हेच मुळी माहीत नसतं. त्या नावांचे अर्थही कुठे लागत नसल्याने काहीतरी हटके कऱण्याच्या नादात पालक मंडळी भान विसरून जातात. या युनिक नावांचा खरपूस समाचार घेणारा एक व्हिडिओ मराठी सृष्टीतील एका कलाकाराने बनवला आहे.
हा कलाकार आहे विहंग भणगे. विहंग भणगे ह्या कलाकाराला तुम्ही ओळखलं असेलच. २००१ सालच्या देवकी या चित्रपटात विहंग भणगे याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तो चूक भूल द्यावी घ्यावी, बॉईज, गुलमोहर, जय भवानी जय शिवाजी अशा चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. विहंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आप्त, रेवन, आहान अशी मुलांची कुठं नावं असतात का? असा प्रश्न त्याने आताच्या पालकांना केला आहे. इंटरनेटवर अशी युनिक नावं शोधू नका असं विहंग या व्हिडीओ मध्ये म्हणत आहे. आकार असं कुठे नाव असतं का? जर असं नाव ठेवलं तर काय म्हणणार आकार मोठा होतोय. प्रणय हे काय नाव आहे? मग त्याच्या मुलाने संभोग नाव ठेवायचं. रिहान हा मुळात मराठी शब्दच नाही.
तुम्हाला तुमच्या मुलांविषयी जर एवढं काही वाटत असेल ना तर इंटरनेटवर नावं शोधू नका. आपल्याकडे संस्कृत नावं आहेत, सूत्र आहेत नामदेवांची गाथा आहे. ज्ञानेश्वरी आहे, असंख्य पुराण आहेत त्यातून नाव शोधा. त्यातून चांगले शब्द काढा आणि तुमच्या मुलांना त्यांच्या नावांचे अर्थ आणि उच्चार दोन्हीही माहिती असलं पाहिजे. आणि हा व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना समजेल की ही अशी पांचट नावं शोधायची नसतात. विहंगचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. विहंगने अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलाय आणि त्याच्या या रीलवर हास्याचा पाऊसही पडत आहे. अनेकांना त्याचं हे म्हणणं पटलं आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.