अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेला खुपते तिथे गुप्ते हा झी मराठीवरचा शो प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत आहे. काही राजकारणातील मोठमोठ्या व्यक्तींना आमंत्रित केल्यानंतर आता शोमध्ये मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नुकतेच शोमध्ये सई ताम्हणकर हिने हजेरी लावली होती. गुप्तेने विचारलेल्या प्रश्नांवर सईने चपखल उत्तरं दिलेली पाहायला मिळाली. या मंचावर आता अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आणि आयआरएस अधिकारी तसेच एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांची हजेरी लागणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप प्रत्यारोप झाले.
यासर्व परिस्थितीला क्रांती रेडकर पती समीरच्या बाजूने उभी राहिली ट्रोलर्सना तिने वेळोवेळी चोख प्रतिउत्तरही दिले. आता पहिल्यांदाच समीर वानखेडे जनतेच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसणार आहेत. त्यामुळे ही मुलाखत चांगलीच गाजलेली पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारच्या भागात समीर वानखेडे खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर येत आहेत. यावेळी अवधूत गुप्तेने समीर वानखेडे यांना दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येतात का? असा प्रश्न विचारला. तेव्हा समीर वानखेडे उत्तर देताना म्हणतात की,हे आमच्यासाठी खूप लहान क्रिमीनल्स आहेत आणि त्यांचं नाव घेऊन त्यांना फेमस नाही करणार. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाही. मी त्याला चॅलेंज करतो की तिथे परदेशात बसून धमक्या वगैरे देऊ नकोस, हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या दे.
समीर वानखेडे यांचे हे चोख उत्तर पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. काहींनी या उत्तराला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अनेकांनी समीर वानखेडे याना ट्रोलही केलं आहे. पण समीर वानखेडे यांच्या भूमिकेने मात्र ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच जिरवली आहे. त्यामुळे हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच खूप उत्साहित झाले आहेत. येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता समीर वानखेडे स्पेशल एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहे. यात ते आणखी कोणकोणती गुपितं उलगडणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. समीर वानखेडे हे खूप कमी बोलतात ते आपल्या कृतीतून सगळ्या गोष्टी करतात. अभिनेत्री क्रांती रेडकर हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र होते. समीर खूप कमी बोलतो असे क्रांती कित्येकदा सांगत असते. पण कुठल्याही कठीण काळात ती समीर वानखेडे यांची साथ देताना दिसते हे विशेष.