शनिवारी २९ जुलै रोजी दादर, शिवजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कृतज्ञ मी कृतार्थ मी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानसी फडके आणि श्रीरंग भावे यांनी नाट्यपदे सादर केली. याच कार्यक्रमात अशोक सराफ यांनी २० ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अशी एकूण १५ लाख रुपये एवढी मदत देऊन केली. यावेळी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांचे भाऊ सुभाष सराफ हेही उपस्थित होते. वृद्धापकाळात पडद्यामागचे कलाकार असो किंवा पडद्द्यासमोरचे कलाकार यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.
अशा कलाकारांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती असेही अशोक सराफ यावेळी म्हणाले. निवेदिताने मला ही कल्पना सांगितली तेव्हा मी सुरुवातीला घाबरलो. कारण बोलणं फार सोपं असतं आणि करणं फार कठीण असतं. पण माझ्या कुटुंबियांच्या मदतीने हे सर्व शक्य झालं. मी या इंडस्ट्रीत आलो तेव्हा कळत नकळत मला अनेकांनी मदत केली होती. त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. ही मदत म्हणून नाही तर ही भेट म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे. यातून त्यांना आनंद झाला असेल तर मी कृतार्थ होईल, असे अशोक सराफ यावेळी म्हणाले. अभिनेते उपेंद्र दाते, प्रकाशयोजनाकार बाबा पार्सेकर, अभिनेत्री अर्चना नाईक, दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, ध्वनी संयोजक नंदलाल रेळे, अभिनेते वसंत इंगळे, निर्माते सुरेंद्र दातार.
लोकनाट्य कलाकार शिवाजी नेहरकर, लेखक दिग्दर्शक किरण पोत्रेकर, नेपथ्यकार सीताराम कुंभार, नेपथ्य सहाय्यक विष्णू जाधव, एकनाथ तळगावकर, रविंद्र नाटळकर, उल्हास सुर्वे, ज्येष्ठ अभिनेत्री विद्या पटवर्धन, गायिका अभिनेत्री दीप्ती भोगले, अभिनेते वसंत अवसरीकर, नाट्यकलावंत हरीश करदेकर अशा कलाकारांचा अशोक सराफ यांनी ७५ हजार रुपये देऊन सन्मान केला. दरम्यान विद्या पटवर्धन या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळुन आहेत. त्यामुळे विद्या पटवर्धन या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत.