बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे कर्ज होते. ‘जत्रा’ हा चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला यावेळी त्यांनी बायकोचे दागिने सुद्धा विकले होते. ९० लाखांचे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
कारण या चित्रपटानंतर जे काही चित्रपट बनले ते फारसे यशस्वी झाले नव्हते. अगबाई अरेच्चा २ हा चित्रपट काढला, सगळ्यांनी या चित्रपटाचं मोठं कौतुक केलं पण या चित्रपटाला जवळच्याच लोकांनी नाकारलं. जवळची लोकंच अशी वागतील याची कल्पनाही मी केली नव्हती असे केदार शिंदे एका मुलाखतीत म्हणताना दिसले होते. आजवर केदार शिंदे यांनी बाईपण भारी देवा चित्रपटाच्या निमित्ताने मीडियाला अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतीतून ते कित्येकदा आपल्या यशाबद्दल बोलले. मात्र प्रथमच त्यांनी ९० लाखांच्या कर्जाचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला. खरं तर हे कर्ज फेडण्यासाठी केदारने चित्रपट बनवले मात्र त्यात म्हणावे तसे यश न मिळाल्याने ते मालिकेकडे वळले.
मालिकेने आर्थिक दृष्ट्या हळूहळू स्थिरता मिळाली. त्यापाठोपाठ त्यांनी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट काढला. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने उचलून धरला. त्यानंतर मात्र बाईपण भारी देवा या चित्रपटाने मोठी उंची गाठलेली पाहायला मिळाली. या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून हा चित्रपट आता प्रेक्षकांचा बनला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. नुकतेच या चित्रपटाने ग्रँड सक्सेस पार्टी साजरी केली होती. त्या पार्टीत मीडियाशी बोलताना केदारने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. त्यात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचे चिरंजीव सोहम बांदेकरला प्रमुख भूमिका देणार असल्याची जाहीर कबुली दिली. या आगामी प्रोजेक्ट मधून सोहमला प्रमुख भूमिकेत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.