केवळ एक दोन चित्रपट करून प्रसिद्धी मिळणाऱ्या अनेक नायिका आहेत. त्यातलीच एक म्हणजे कविता किरण. कविता किरण यांनी १९७८ सालच्या व्ही के नाईक दिग्दर्शित आपली माणसं या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. कविता किरण यांचा हा पहिला मराठी चित्रपट होता. घाऱ्या डोळ्यांची देखणी नायिका त्यांच्या रूपाने मराठी सृष्टीला लाभली होती. डॉ श्रीराम लागू हे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत झळकले होते. तर विक्रम गोखले यांनी नायकाची भूमिका साकारली होती. धुंद हवा बहर नवा झोंबतो गारवा हे रोमँटिक गाणं या दोघांवर चित्रित करण्यात आलं होतं.
गारवा चित्रपटातील जीवन गाणे गातच रहावे हे आणखी एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. हेच गाणं बालपणीच्या पल्लवी जोशी यांनी साकारलं होतं. आपली माणसं, दैवत, थोरली जाऊ या चित्रपटातून यश मिळाल्यानंतर कविता किरण यांनी १९८१ सालच्या गोंधळात गोंधळ चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली होती. अशोक सराफ, रंजना, प्रिया तेंडुलकर, रविंद्र महाजनी, संजय जोग आणि कविता किरण या तिघांच्या जोडीने चित्रपटात धमाल उडवून दिली होती. मराठी चित्रपटातून नायिका म्हणून यश मिळवल्यानंतर कविता किरण हिंदी चित्रपटाकडे वळल्या. मात्र इथे त्यांनी महाबली हनुमान, मान अभिमान, अपना बना लो आणि नास्तिक यांसारखे मोजकेच चित्रपट साकारले. महाबली हनुमान चित्रपटात त्यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री कविता किरण यांनी साकारलेली सीता मातेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. दिग्दर्शक बाबुभाई मिस्त्री यांनी महाबली हनुमान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सन १९८१ मध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटातील एनिमेशन विशेष पद्धतीने बनविण्यात आले होते. तर नास्तिक चित्रपटात त्यांनी प्राणच्या बहिणीची भूमिका साकारली होती. कालांतराने मराठी सृष्टीची ही नायिका चंदेरी दुनियेतून बाजूला झाली ती कायमचीच. सध्या कविता किरण कुठे आहेत आणि काय करतात, याबद्दल कुठेही माहिती उपलब्ध नाही. त्या आता कशा दिसत असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना निश्चितच असणार. मात्र असे असले तरी आजही त्यांच्यावर चित्रित झालेली ही दोन्ही गाणी आठवल्यावर त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.