बाईपण भारी देवा हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला महिला वर्गाकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सहा बहिणींची ही कथा महिला प्रेक्षकवर्गाने उचलून धरली असल्याने हा चित्रपट तिकीटबारीवर चांगली कमाई करत आहे. एक उत्तम कथानक, उत्तम सादरीकरण अशी जमेची बाजू असताना केवळ या सहा नायिकांनी आपल्या खांद्यावर चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. सहा बहिणी ज्या बऱ्याच वर्षाने मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येतात आणि त्यांच्यात जी धमाल घडते ती प्रेक्षकांनी आपलीशी केलेली पाहायला मिळत आहे.
नावाप्रमाणेच बाईपण भारी देवा चित्रपटाचे कथानक सुद्धा भारी जुळून आलंय अशी चर्चा सगळीकडे पहायला मिळत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी सृष्टीला चांगला चित्रपट मिळाला असे या चित्रपटाच्या बाबतीत म्हटले जात आहे. चित्रपटात सुकन्या कुलकर्णी मोने यांनी साधनाची भूमिका साकारली आहे. एक चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या साधनाचा लूक सुद्धा तसाच देण्यात आला आहे. चौकोनी टिकली आणि चेक्स असलेल्या साड्या सोबतच साधेसे दागिने अशी साधनाची भूमिका सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. साधनाला नृत्याची आवड असते मात्र तिचे सासरे त्यासाठी विरोध करतात तेव्हा साधना तिच्या बोटातील नटराजाची अंगठी आतल्या बाजूला वळवते. कालांतराने साधना चौकट मोडते तेव्हा ती अंगठी पूर्ववत करते.
चित्रपटातला हा सिन प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिलेला आहे. या अंगठीची एक खास गोष्ट अशी आहे की ही अंगठी सुकन्या कुलकर्णी यांचीच आहे. सुकन्या कुलकर्णी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यामुळे त्यांच्या बोटात नटराजाची अंगठी कायमस्वरूपी असते. आपल्या बोटातून ती अंगठी त्या कधीच काढत नाहीत हे विशेष. केदार शिंदेने चित्रपटातून या अंगठीचा योग्य तो उपयोग करून घेतला. साधनाची तरूणपणीची भूमिका सुकन्या यांची मुलगी जुलियाने केली आहे. चित्रपटाची मागणी म्हणून जुलियाला तशीच अंगठी बनवण्यात आली होती. खऱ्या आयुष्यात जुलियाला तशीच अंगठी बनवून घ्यायची होती. मात्र तसा योग जुळून येत नव्हता. पण केदार शिंदेमुळे हा योग जुळून आला.