कुठल्याही कलाकारासाठी पहिला प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो. अशातच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो आयुष्यातील सोनेरी क्षण मानला जातो. असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई हिने घेतला आहे. नुकत्याच एका सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यात जनाई चित्रपटात पदार्पण करतीये अशी एक घोषणा करण्यात आली, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. जनाई भोसले हिला याबाबत अजिबात कल्पना नव्हती.

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संदीप सिंग मंचावर आले आणि त्यांनी द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केले. या चित्रपटात संदीप सिंग छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी राणी सईबाई यांची भूमिका साकारणार असे जाहीर करण्यात आले. पदार्पणातच आपल्याला राणी सईबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळते हे पाहून जनाईला गहिवरून आले होते. डोळ्यातले अश्रू पुसत तिने या ऐतिहासिक भूमिकेसाठी आपली निवड केली असल्याचे पाहून आभार मानले. तर आशा भोसले यांनीही नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण होतंय हे पाहून तिचं मोठं कौतुक केलं. जनाई ही आशा भोसले यांची नात आहे. जनाईला लहान असल्यापासूनच गायनाची आवड होती.

आजीच्या पावलावर पाऊल टाकत आपल्याला याच क्षेत्रात करिअर करायचं हे तिचं ठरलेलं होतं. म्हणूनच लहानपणीच तिने गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. जनाई अनेक सोहळ्यामध्ये आजीसोबत गाताना पाहायला मिळते. ती दिसायलाही अतिशय सुंदर असल्याने तिने चित्रपटातही नशीब आजमावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. त्यांची हीच इच्छा आता लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे दिसून येते. द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात संदीप सिंग आणि जनाई भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर इतर कलाकारांचीही नावं लवकरच जाहीर करण्यात येतील. दरम्यान संदीप सिंग यांनी चित्रपटाच्या नायिकेचे नाव जाहीर करताच जनाईच्या चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तिच्या या अभिनय क्षेत्रातील पदार्पणासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.