कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. या वाहिनीवरील तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने संध्याकाळी ७ वाजता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. येत्या ३० मे पासून ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शंकर महाराज यांच्या बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत प्रेक्षकाना पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री उमा ऋषिकेश या मालिकेत शंकर महाराजांची आई पार्वती बाईंची भूमिका साकारणार आहे. तर शंकर महाराजांच्या वडिलांची, चिमणाजींची भूमिका अभिनेता अतुल आगलावे साकारणार आहे. संदीप गायकवाड आणि सिद्धी पाटणे हे शिवपार्वतीची भूमिका निभावणार आहेत. मालिकेत बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका ‘आरुष बेडेकर’ या बालकलाकाराने साकारली आहे. आरुष बेडेकरचे कुटुंबीय अहमदनगर येथे वास्तव्यास आहे. आरुषचे वडील प्रसाद बेडेकर हे देखील कलाकार आहेत. अहमदनगर येथील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. वाचक, मुलाखतकार अशी त्यांची ओळख आहे.
बेडेकरांचे इंग्लिश क्लासेसमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच आरुषला देखील कलाक्षेत्राची आवड निर्माण झाली. योगयोगेश्वर जय शंकर ही आरुषची बालकलाकार म्हणून पहिली टीव्ही मालिका आहे. मालिकेत येण्याअगोदर आरुषने नाटकातून काम केले आहे. त्यामुळे आपल्या या मध्यवर्ती भूमिकेबाबत तो खूपच उत्सुक आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यावरून या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांच्याही मनात निर्माण झाली आहे. उमा ऋषिकेश या मालिकेत आईची भूमिका साकारत असून, स्वामिनी या मालिकेत उमाने पार्वतीबाईंची भूमिका वठवली होती.
या दोन्ही भूमिका माझ्यासाठी एकसमान आहेत कारण या भूमिकेबाबत मातृत्वाचे भाव आणि देवावर श्रद्धा दाखवण्यात आली आहे. साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा सहवास लाभलेल्या परमपूज्य शंकर महाराजांची आई साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच या भूमिकेविषयी जाणून घेणे त्यावर अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ही भूमिका मी अतिशय जबाबदारीने सांभाळणार असे उमाचे म्हणणे आहे. या पहिल्या मालिकेसाठी आरुषचे आणि मालिकेतील सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा.