आपले मत, विचार, मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर सोशल मिडिया हे एक उत्तम माध्यम आहे. आपल्या या मतांचा, विचारांचा आदर ठेवणारी आणि त्याला सहमती देणारी अनेक मंडळी तुमच्याबाजूने असतील तर काही तुमच्या विरोधातही बोलतील. मात्र सततची टीका आणि कुटुंबाला धमक्या देणं हे प्रकरण जर वाढत जात असेल तर त्याला योग्य वेळी आला घालणे गरजेचे असते. असेच काहीसे घडले आहे प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांच्याबाबत. सततच्या टीकेला मी भीत नाही मात्र कुटुंबाला धमक्या देणं आणि नवऱ्याला विनाकारण त्रास देणं हे वाढत गेल्याने मी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे शेफाली वैद्य यांनी म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी नो बिंदी नो बिजनेस ही मोहीम त्यांनी सुरू केली होती. जाहिरातींमधील मॉडेल्स बिना टिकलीच्या आढळल्यास त्या वस्तू आम्ही खरेदी करणार नाहीत म्हणत व्यावसायिकांना त्यांनी हैराण करून सोडले होते. हिंदूंच्या बाजूने आपली परखडपणे मतं व्यक्त केल्यामुळे शेफाली वैद्य सोशल मीडियावर देखील लोकप्रिय झाल्या आहेत तर अनेकांकडून त्यांना टीकाही सहन कराव्या लागल्या आहेत. अशा टीकाकारांना त्यांनी एक ईशाराच दिला आहे. ‘मी स्पष्ट बोलते, स्पष्ट लिहीते. टीकेला कधीच घाबरत नाही. सभ्य शब्दात प्रतिवाद करणाऱ्या कुणालाही मी आजवर ब्लॉक केलेलं नाही की अश्या कॉमेंट डिलीट केलेल्या नाहीत. हे माझी वॉल फॉलो करणारी कुणीही व्यक्ती सांगेल.
स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाईक समजणाऱ्या काही तथाकथित विचारजंत लोकांसारखे मी कॉमेंटसही कधी ऑफ करून बंद दाराआड तलवारी फिरवत नाही. ही विचारांची लढाई मी जाणीवपूर्वक लढतेय आणि लढाई म्हटली की दोन घाव देणे आले, घेणे आले, त्याला कधीच माझी ना नव्हती. माझ्या वैचारिक स्पष्टतेची मी जबर किंमत मोजलेली आहे. ह्या आधी दोनदा मला पोलिसात तक्रार करावी लागलेली आहे. माझ्या कुटुंबाला धमक्या आलेल्या आहेत, माझ्या नवऱ्यावर, त्याचा कशाशीही काहीही संबंध नसताना, चिखल उडवला गेलाय. मला स्वतःला तर ‘मोदींबरोबर झोपायचे किती पैसे मिळतात तुला’ इथपासून ते ‘तुला भर चौकात मुस्काटीत मारून धिंड काढली पाहिजे.’ अश्या कॉमेंट्सचा सामना अनेक वेळा करावा लागलाय.
माझ्यावर टीका करायची आहे? जरूर करा, मी भ्याड नाही. प्रोफाईल लॉक करून मी इतरांच्या वॉल वर जाऊन कॉमेंटच्या फुसकुल्या सोडत नाही. माझं फेक अकाउंट नाही, मी कॉमेंट बंद ठेवत नाही आणि सभ्य भाषेत टीका केली तर कुणाला ब्लॉकही करत नाही. पण परत माझ्या वॉलवर येऊन घाणेरडे शब्द वापरले, धमक्या दिल्या, माझी जात काढली, माझ्या कुटुंबाला मध्ये आणलं. माझ्यावर अश्लील मीम शेर केले, मला मारायची, माझा आवाज बंद करायची धमकी दिली तर याद राखा, आता ऐकून घेणार नाही. एकाला अटक झालेली आहे, दुसरा अटक होण्याच्या मार्गावर आहे आणि इतर अनेक रांगेत आहेत. तेव्हा शब्द जपून वापरा.