Breaking News
Home / जरा हटके / तुकोबारायांची भूमिका साकारावी ती विष्णुपंत यांनीच.. संत तुकाराम चित्रपटाच्या खास आठवणी
vishnupant pagnis sant tukaram
vishnupant pagnis sant tukaram

तुकोबारायांची भूमिका साकारावी ती विष्णुपंत यांनीच.. संत तुकाराम चित्रपटाच्या खास आठवणी

आज तुकाराम बिज अर्थात त्यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस. संत तुकाराम महाराजांची प्रचिती गाथेतून आणि त्यांच्यावर आधारित चित्रपटातून पाहायला मिळते. १९३६ साली संत तुकाराम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल ५७ आठवडे हाऊसफुल्ल चाललेला हा चित्रपट त्यावेळी प्रभात फिल्म कंपनीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारा ठरला होता. खरं तर ही भूमिका आजवर अनेक कलाकारांनी साकारली. मात्र तुकोबारायांची भूमिका साकारावी ती विष्णुपंत पागनिस यांनीच हे आजही बोलले जाते. ही भूमिका साकारल्यानंतर विष्णुपंत पागनिस हे खऱ्या आयुष्यातही तशाच पेहरावात वावरत होते. चित्रपटानंतर लोक घरात त्यांचा तुकाराम महाराजांचा फोटो लावत होते.

vishnupant pagnis sant tukaram
vishnupant pagnis sant tukaram

परदेशात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट अशीही ओळख या चित्रपटाने निर्माण केली होती. १९३७ सालच्या ५ व्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाने मान मिळवला होता. प्रभात फिल्म कंपनीचे विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. विष्णुपंत पागनिस यांनी संत तुकारामांची भूमिका तर त्यांच्या मुलाची भूमिका याच चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुपंत दामले यांच्या मुलाने पंडित उर्फ वसंत विष्णुपंत दामले यांनी साकारली होती. चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीत, जे सध्या FTII नावाने ओळखले जाणाऱ्या स्टुडिओतच झाले होते. नदीत बुडवलेल्या गाथांचे चित्रीकरण तिथल्याच बनवलेल्या कृत्रिम तळ्यात करण्यात आले होते.

sant tukaram movie
sant tukaram movie

संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे चित्रीकरण दाखवण्यासाठी गरुडाची तांत्रिकदृष्ट्या रचना केली होती. दोन वेळा हे गरुड कलाकारांना घेऊन उडाले परंतु तिसऱ्या वेळी मात्र खाली कोसळले. त्यावर बसलेले विष्णुपंत पागनिस यांच्यासह असलेल्या दोन पऱ्या म्हणजेच महिला कलाकार आणि गरुडामध्ये त्याचे पंख हलवण्यासाठी बसलेला एक व्यक्ती असे चौघेही गरूडासोबत खाली कोसळले. या घटनेमुळे सेटवर भयंकर धुळ पसरली तर गोंधळामुळे धावपळीत अनेकांना दुखापतही झाली. चित्रीकरण पाहायला मिळावे यासाठी प्रभात स्टुडिओत दररोज शेकडो लोकं येत असत. विष्णुपंत पागनिस यांना तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या कलाकार गौरी यांनी त्या ढिगाऱ्यातून बाहेर खेचले होते. मात्र दुर्दैवाने गरुडाच्या आत बसलेली व्यक्ती दुर्घटनेत भयंकर जखमी झाली होती.

तात्काळ उपचारासाठी त्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल केले, परंतु यात त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्यानंतरही प्रभात कंपनीने या व्यक्तीला कायमस्वरूपी कामावर ठेवले होते. चित्रपटाची आणखी एक आठवण म्हणजे, प्रभातच्या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट ही तुतारीच्या आवाजाने होत असे. संत तुकाराम चित्रपट हाऊसफुल चालला त्यावेळी चित्रपट संपला तरी शेवटच्या क्षणी ती तुतारी वाजली नसल्यामुळे प्रेक्षक जागेवरच बसून होते. आयोजकाला काय करावे हेच समजेनासे झाले. यावर युक्ती काढून ऑपरेटरला त्यांनी पहिला रील दाखवण्यास सांगून पडदा खाली ओढला. तुतारी वाजली म्हणजे चित्रपट संपला असे समजून प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. चित्रपटाच्या या काही आठवणी यातील बालकलाकार असलेले पंडित उर्फ वसंत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.