महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच वर्षांपासून या शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन करत सर्वच कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मधल्या काळात या शोने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला. नंतर तेवढ्याच नव्या दमाने ही कलाकार मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आली. मात्र सुरुवातीच्या बहुतेक कलाकारांनी हा शो सोडून वेगळ्या प्रोजेक्टकडे आपली पाऊले वळवली. अर्थात विशाखा सुभेदार यांनी खूप आधीच या शोमधून एक्झिट घेतली होती. शो सोडण्यामागचे कारण त्यांनी अजूनही स्पष्ट केलेले नव्हते. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत उघडपणे बोललं आहे.
विशाखा सुभेदार या हास्यजत्रेचा एक महत्वाचा भाग म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे अनेक जण चाहते आहेत. हास्यजत्रा का सोडली याबाबत त्या म्हणतात की, एकच एक भूमिका करत राहिल्याने मला त्या भूमिकेचा कंटाळा आला होता. आपण ज्या पठडीतल्या भूमिका करतो, लोक त्याच नजरेतून आपल्याला पाहत असल्याने पुढे चित्रपटातूनही अशाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा मी निर्णय घेतला. कधी कधी वाटायचं की मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलतीये. कारण आपल्या मिळणाऱ्या मानधनातून आपल्या कुटुंबाचा गाडा चालतो. मग हा निर्णय घेत असताना मला माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा देखील पाठिंबा मिळाला.
आपल्या जवळच्या व्यक्तींकडून एवढा जरी पाठिंबा मिळाला तरी काम करण्याची जिद्द आपसूक निर्माण होते; तसे माझ्याबाबत झाले. आता मी नाटकाच्या निर्मितीकडे वळली आहे. नाटकासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, अगदी नाटकाचे साहित्य ठेवायला लागणाऱ्या पेट्या देखील मी कमी किंमतीत कुठे भेटतील यासाठी मी धडपड केली होती. एवढेच नाही तर त्याला लागणारे कुलुप आणि ते हरवल्यावर विचारलेला जाब यातूनच तुम्हाला यामागची माझी मेहनत लक्षात येईल. माझ्या पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मी आणखी एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार; असा ठाम विश्वास मला आहे. हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता.
महाराष्ट्राची हास्यजत्राने मला भरभरून दिलं आहे. पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्यानेच मी हा शो सोडला. महिन्याकाठी आपल्या हातात मिळणारी एक रक्कम आता यापुढे मिळणार नाही याची जाणीव मला होती. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे मी निर्मिती क्षेत्राकडे वळण्याचे शिवधनुष्य पेलले. विशाखा सुभेदार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत काम केलं आहे. या क्षेत्रात येण्याअगोदर त्यांनी सेल्सवूमन बनून घरोघरी जाऊन वस्तू, साड्या विकल्या होत्या. या स्ट्रगलची जाणीव त्यांना आजही आहे आणि म्हणूनच कुठेतरी मोठं पाऊल उचलून त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागतच केलेले पाहायला मिळते.