मन उडू उडू झालं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट २०२१ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या आतच या मालिकेने प्रेक्षकांचा हिरमोड न होता आटोपते घेण्याचे ठरवले. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, रिना अगरवाल, शर्वरी कुलकर्णी, विनम्र बाभल, ऋतुराज फडके, पूर्णिमा तळवळकर, अरुण नलावडे, रूपलक्ष्मी शिंदे या कलाकारांचे एकमेकांशी खूप छान बॉंडिंग जुळून आले होते. मालिकेच्या सेटवर ही कलाकार मंडळी आपल्या कुटुंबाप्रमाणे एकत्र येत होती. मालिका संपल्यानंतर आम्ही एकमेकांना खूप मिस करू अशा भावना त्यांनी निरोप देताना व्यक्त केल्या होत्या.
आज विनम्र बाभल म्हणजेच मालिकेतला सत्तूचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ऋतुराज फडके याने काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. ‘विनम्रला मी खूप आधीपासून ओळखायचो पण आमची भेट अशी कधीच झाली नव्हती. मला आठवतंय मन उडू उडू झालं या मालिकेचा पहिला दिवस माझा ५ ऑगस्ट मी रीक्षेने येत होतो आणि विनम्र मला रस्त्यात भेटला. मी त्याला म्हटलं कुठे चाललास? बस आपण एकत्र जाऊ. आपली पहिली भेट अशी होईल वाटल नव्हतं वगैरे वगैरे आमच्या गप्पा सुरू. तेव्हा आम्हाला एकमेकांना माहिती नव्हतं की आम्ही एकाच मालिकेत काम करतोय. रीक्षेतून उतरल्यानंतर मी त्याला म्हटलं की अरे तो अमुक अमुक बंगला कुठे आहे, तो म्हणाला हा काय इथेच.
मी पण तिथेच चाललोय तू काय करतोयस? झी मराठीची नवीन सिरीयल मी पण तीच करतोय आणि दोघे हसायला लागलो. त्यानंतर त्यादिवशी पहिलाच आमचा दोघांचा सीन होता तो हा फोटो. पहिल्याच दिवशी पहिल्याच सीन मध्ये आमची उत्तम केमिस्ट्री जुळली. ते होण्यामागे पण एक कारण होतं कारण आम्ही दोघेही नाटकवाले. त्या दिवसानंतर मात्र विनम्र हळूहळू समजत गेला. वाचन वेडा, या मुलाला खूप वाचनाची आवड. सेट वरती काहीही घडो या मुलाच्या हातात पुस्तक असतं म्हणजे असतं. आम्हाला वाटलं होतं की विनम्रमुळे आम्हाला वाचनाची आवड लागेल. पण झालं उलटच आमच्यामुळे त्याची थोडी थोडी वाचनाची आवड कमी व्हायला लागली. इतकी फालतुगिरी आम्ही सेट वरती करायचो.
सकाळी नाष्टा आणण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली होती. सकाळी प्रत्येक ॲक्टरला फोन करून तू काय खाणार आहेस, तू काय खाणार आहेस, तू काय खाणार आहेस. असं म्हणत सगळ्यांना तो नाष्टा घेऊन यायचा, सतत हसतमुख असणारा, अभिनयाची उत्तम समज असणारा. प्रचंड मेहनती असणारा, असा विनम्र, माझ्यासाठी विनू कधी झाला कळलच नाही. अशा माझ्या विनूला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा. तुला तुझ्या मनासारखं काम मिळू देत आणि ते काम करण्यासाठी परमेश्वर तुला प्रचंड ताकद देऊदेत अशी मी वरच्या विधात्याकडे प्रार्थना करतो. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा!’.