८० च्या दशकात अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या विजय पाटकर यांनी मराठी सृष्टीत हरहुन्नरी विनोदी कलाकार म्हणून स्वतःची ओळख बनवली. खरं तर विजय पाटकर यांना बालपणी स्पष्ट बोलताही येत नव्हतं. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत ते अडखळत बोलायचे. त्यानंतरही बरीच वर्षे ते ह्याचा न्यूनगंड बाळगत असत. ज्युनिअर कॉलेजमध्ये गेल्यावरही त्यांचा दुरान्वये अभिनयाशी संबंध आला नव्हता. बारावीत शिकत असताना त्यांना एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. विजय पाटकर यांनी डाय मारत स्टेजवर एन्ट्री केली, त्यांच्या या एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर विजय पाटकर यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर अगदी हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाची छाप सोडली. विनोदी चित्रपट बनवणं त्यात अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करणं विजय पाटकर यांना भयंकर आवडतं. कारण विनोद करणं हे फार मोठं कठीण काम आहे. चित्रपटातून एखाद दोन विनोद करणं म्हणजे तो चित्रपट विनोदी ठरतो असं मुळीच नसतं. दोन तास प्रेक्षकांना हसवत ठेवायचं असेल तर विनोदाचा दर्जा देखील असायला हवा. मला ते जमलं असं मात्र अजिबात नाही, कारण अजूनही माझा तो प्रयत्न चालू आहे. निर्माता म्हणून मी तीन मराठी चित्रपट केले, तर दहा चित्रपट मी दिग्दर्शित केले. पण तरीही मला विनोदी चित्रपट जमले असं मी अजिबात म्हणणार नाही, असे विजय पाटकर यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
विजय पाटकर दिग्दर्शित कॉमेडी डॉट कॉम नावाची सीरिअल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली. त्याकाळात कामाचे पैसे देणं पाटकरांना शक्यच नव्हतं. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मी तुझ्याकडे काही पैसे मागतोय का? असा दिलासादायक प्रश्न केला. तू काय देशील ते मी घेईल, १ रुपया जरी दिलास तरी मी काम करीन असे म्हणून त्यांनी काम करण्यास सहकार्य केले. सिरिअल मध्ये रिमा लागू यांनी विजय पाटकरांकडे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इथेही पैशांची अडचण भासल्याने रिमा लागू यांनी सहकार्य दर्शवले. केवळ पैशासाठी काम करणे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुळीच मान्य नव्हते. महेश कोठारे यांच्या पहिल्या चित्रपटात काम करण्यासाठी महेशजवळ पुरेसे पैसे नसल्याचे कळताच, केवळ १ रुपया घेऊन चित्रपटात काम केले होते.