प्रवासादरम्यान कलाकारांना चांगले वाईट असे अनुभव येत असतात. हे अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करतात. विद्या करंजीकर या ज्येष्ठ अभिनेत्री गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दाम्पत्य अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त विद्या करंजीकर या नाशिकला गेल्या होत्या. तिथून मुंबईला परत येत असताना त्यांना एक त्रासदायक अनुभव मिळाला. याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी नाशिकहून मुंबईला जाणार होते. मुंबई नाक्यावर प्रायव्हेट गाड्या पर सीट घेऊन जातात.
गाडीत अजून दोन पॅसेंजर हवेत म्हणून मी आणि अजून एक व्यक्ती दोन पॅसेंजरची वाट पाहत उभे होते. अर्ध्या तासाने तिसरा पॅसेंजर मिळाला त्यानंतर चौथ्याची वाट बघत होतो. तेवढ्यात एक माणूस गाडीतून आला त्याच्यासोबत एक कुत्र्याचं पिल्लू होतं. ते पिल्लू एका बास्केटमध्ये होत. सीट भरणारा व्यक्ती होता त्यासोबत त्याचं काहितरी बोलणं झालं आणि त्यानंतर लगेचच तो चौथी सीट मिळाली म्हणत आम्हाला बसायला सांगितलं. मी पुढे बसले, मागे दोन पॅसेंजर आणि त्या दोघांच्या मध्ये त्याने कुत्र्याचं पिल्लू ठेवलं होतं. तो व्यक्ती कुत्र्याचं पिल्लू तसंच सोडून निघून चालला. तेव्हा मी त्याला म्हटलं की हे असं कसं करू शकता. तुम्ही एवढस चार पाच महिन्याच पिल्लू एकटं सोडून कसं जाऊ शकता? प्रवासात त्याला भूक लागली तर ते भुंकणार, शी शु केली तर काय करायचं?
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की आम्ही असं नेहमी करतो. हायवे वर एक माणूस येईल तो त्याला उतरवून घेईल आणि मी आताच त्याला खाऊ घातलं आहे. असे म्हणत तो व्यक्ती निघून गेला. तर मी ड्रायव्हरला याचा जाब विचारला. तेव्हा तो ड्रायव्हर कालपासून नाशिकलाच होता. अगोदरच पॅसेंजर मिळत नसल्याने तोही वैतागलेला होता. ऑल रेडी खूप उशीर झाल्याने मलाही मुंबईला जायचं होतं. तेव्हा आम्ही प्रवासाला निघालो. पण प्रवासात जसा खड्डा येऊ लागला तसं ते पिल्लू घाबरून ओरडायला लागलं. मध्ये एकेठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. जेवण झाल्यानंतर पुढे तो व्यक्ती जिथे येणार तिथे थांबलेला होता, त्याला फोन करायला सांगितला. तेव्हा तो व्यक्ती मी तिथेच उभा आहे असे म्हणाला. पण जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी तो व्यक्ती तिथे पोहोचलाच नव्हता.
दहा मिनिटं, पंधरा मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास आम्ही तिथे वाट पाहत थांबलो होतो तरीही तो व्यक्ती तिथे आलाच नाही. जवळच एक पोलिसचौकी होती. आम्ही तिथे गाडी नेली आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली. आणि तो व्यक्ती आल्यावर हे कुत्र्याचं पिल्लू त्याला द्या म्हणून विनंती केली. तेव्हा पोलिसांनी आम्ही आली कामं करत नाही असे म्हणत आम्हाला तिथून जायला सांगितले. पोलीस कुठल्याही परिस्थितीत मदत करत नव्हते ते पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला तसेच निघालो तेवढ्यात त्या व्यक्तीचा फोन आला आणि मी मार्केट मध्ये गेलो होतो लगेच येतोय तुम्ही तिथेच थांबा असे तो म्हणाला. तेव्हा ड्रायव्हरने पॅसेंजरला घाई असल्याचे सांगितले त्याने तसाच फोन माझ्याकडे दिला तेव्हा मी त्या व्यक्तीला खूप झापलं. दहा मिनिटांनी तो टू व्हीलरवर आमच्याजवळ आला.
एकट्या पिल्लाला असं कसं गाडीतून सोडता आणि वेळेवर घ्यायलाही येत नाही म्हणून मी त्याला ओरडले. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पेटाचे कोणीही कार्यकर्ते असतील त्यांना हे विचारायचंय की हे असं चालतं का? चार पाच महिन्यांच ते पिल्लू चक्क एकट्याला असं पॅसेंजर सोबत पाठवतात हे असं कसं करू शकतात? आणि हे आताच नाही तर हे ते नेहमी करतात असेही ते सांगतात. मला ह्या गोष्टीचं खरंच फार आश्चर्य वाटतंय. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, मी ह्या बाबतीत कुठे कम्प्लेन्ट करू? मला खरंच खूप राग आलाय की त्या छोट्याशा पिल्लाला असं पाठवून देतात. ह्युमिनिटी वगैरे काहीच नाही, अस अलाऊड आहे? असा प्रश्न विद्या करंजीकर यांनी विचारला आहे.