झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. मालिका सृष्टीत आता सासू सुनेच्या भांडणाला बगल देत एक नव्या धाटणीची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली जात आहे. श्यामची आई अर्थात साने गुरुजींना घडवणाऱ्या यशोदाची गोष्ट तुम्हाला यशोदा या मालिकेतून पहायला मिळणार आहे. यशोदा या नवीन मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आईने दिलेले आंबे बयो आपल्या भावंडांना खायला देते. तेव्हा तू का नाही आंबा खाल्लास असे तिला विचारले. ती म्हणते की, मला आंबे खायला नाही मिळाले तरी चालतील, मात्र माझ्या भावंडांना ती खायला मिळाली.
यातूनच मला त्याचा गोडवा मिळतो असे ती समजूतदारपणाची शिकवण देते. प्रोमोमधून साने गुरुजींची आई म्हणजेच बालपणीची बयोची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे प्रोमोमधूनच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली पाहायला मिळत आहेत. १३ फेब्रुवारी २०२३ पासून यशोदा ही नवीन मालिका दुपारी १२.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शन वीरेंद्र प्रधान यांनी केले आहे. साने गुरुजींना घडवणाऱ्या आईची गोष्ट छोट्या पडद्यावर दाखवण्यात यावी या हेतूने वीरेंद्र यांनी ही मालिका करण्याचे निश्चित केले. झी मराठीवरील उंच माझा झोका मालिकेचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. विशेष कथानक असलेल्या मालिकांमधून वीरेंद्र प्रधान दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे सांभाळताना दिसले आहेत. छोट्या बयोच्या भूमिकेत बालकलाकार वरदा देवधर हिला त्यांनी ही संधी देऊ केली आहे.
वरदाला अभिनयाची आवड असून ती गेल्या काही वर्षांपासून आभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे. या मालिके अगोदर स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत सुद्धा वरदा झळकली होती. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी वरदाला ओळखले असेलच. झी मराठी वाहिनीने आजवर अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. त्यामुळे झी वाहिनीचा प्लॅटफॉर्म मिळणे म्हणजे नवख्या कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासारखेच आहे. वरदा छोट्या बयोची भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. वरदा सोबत ईशान आणि अर्जुन हे बालकलाकार या मालिकेत तिच्या भावंडांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे येत्या काही दिवसातच समोर येईल. तूर्तास वरदा देवधर हिला यशोदाच्या बालपणीच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.