राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांचा आतुर हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण पाटील यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. धग, चंद्रभागा, हलाल, लफडा सदन आणि भोंगा या चित्रपटात त्यांनी विविध विषयाला हात घातलेला पाहायला मिळाला. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. धग आणि भोंगा या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सामाजिक भान राखणारा दिग्दर्शक अशी त्यांची गणना केली जाते. म्हणूनच त्यांचा आतुर हा आगामी चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

आतुर या चित्रपटात अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रीतीने अनेक जाहिरातींमधून काम केले आहे. प्रतिभावंत दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं प्रिती सांगते. मूळ उद्योजिका असलेल्या प्रिती यांनी याअगोदर ईश्वरी या चित्रपटातही काम केलं आहे. ईश्वरी चित्रपट अद्याप प्रदर्शित होणे प्रलंबित असले तरीही विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रितीने एका मूकबधिर मुलीची भूमिका साकारली आहे. संगीताची कास धरणाऱ्या या मूकबधिर मुलीच्या भूमिकेत प्रीतीच्या अभिनयाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाद मिळाली.

प्रितीला तिच्या अभिनयासाठी विशेष पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान प्रितीची दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांच्याशी ओळख झाली. प्रितीकडून सहज येणारे हावभाव पाहत आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रितीच योग्य असल्याचं त्यांनी अचूकरित्या ओळखलं. दोनदा राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी मिळणं याच्यावर काही दिवस ती तिचा विश्वासच बसत नव्हता. शुटिंगच्या काळातही शिवाजी लोटण पाटील कलाकारांकडून सहजरित्या अभिनय करवून घेण्यात तरबेज असलेले पाहायला मिळतात. भूमिकेच्या तयारीसाठी वर्कशॉप वर त्यांचा मुळीच विश्वास नाही. सहज भूमिकेत शिरण्यासाठी शिवाजी लोटण पाटील यांचं दिग्दर्शनच पुरेसं असल्याचं प्रीती सांगते.
चित्रपटात प्रिती एका गृहिणीची असून आपल्याला मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कथा मांडण्यात आली आहे. केवळ पंधरा दिवसातच या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. चित्रपटाची संपूर्ण टीमच्या सहकार्यमुळे शुटींगमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. भूमिकेत मला माझं शंभर टक्के देता आलं, असे प्रिती सांगते. ईश्वरी द म्युजिक ऑफ सायलेन्स या म्युजिक व्हिडिओतून ती झळकली होती. आतुर या चित्रपटाबाबत तिलाही तितकीच आतुरता आहे असे ती म्हणते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बोलले जात आहे.