थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाच्या बातमीने तमाम जनतेने हळहळ व्यक्त केली. माईंचा जीवनप्रवास लहानपणापासूनच खूप खडतर होता. माईंचे ९ व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत लग्न झाले. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. चौथ्या वेळी गर्भवती असताना आयुष्यातला पहिला संघर्ष केला. गुरं वळून शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या, त्याबद्दल मजुरी मिळायची नाही. हा लढा जिंकल्या पण याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागली. लोकांनी नवर्याच्या मनात चारित्र्याबद्दल संशय निर्माण केला, माईंना बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवर्यानं हाकलल्यानंतर गावकर्यांनीही हाकललं.
दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी नांदेड मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. जळगाव पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. सगळ्या भिकार्यांना बोलावून मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या. एकदा असंच पुण्यात माईंना एक मुलगा सापडला, माईंनी त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २ मुलं रस्त्यावर भीक मागताना भेटली, त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. बालगंधर्व मधील एका कार्यक्रमात त्यांनी थेट स्टेजचा ताबा मिळवत आपली व्यथा मंडळी, सुनील दत्त यांनी जेवू घातलं. दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसेनी माईंच्या मुलीला, ममताला सांभाळण्याची तयारी दाखवली.
माई सांगतात, “रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? माझी माया जागृत झाली असती, तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? माझ्यातली आई चुकली असती तर माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता.” पुढे आकाशवाणीचे यशवंत खरात यांनी माईंना कार्यक्रम करायला आमंत्रण दिलं. गाणी गाऊन ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवर त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले. माईंनी चिखलदर्याला एक झोपडी बांधून आश्रम थाटला. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्याला आणली. महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत, ११०० मुलं तिथे राहतात. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी.
माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलायचा. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला होता. गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं. ‘मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही’. म्हणून माई शेवटपर्यंत लोकांसमोर पदर पसरला. सात आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होई. ‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून अनवाणी आयुष्यभर हिंडल्या. कोणी पाच रुपये जरी दिले तरी त्यांना तितकाच आनंद व्हायचा. माईंची वणवण शेवटपर्यंत सुरू होती, पदर पसरून त्या गात असत, निखार्यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं, कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं, सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी.