२ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता. गोड गळ्याच्या या चिमुरड्या स्वराला तिचे बाबा कोण असतात या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. बंगाली मालिका पोटोल कुमार गानवाला या मालिकेवरून, हिंदी कुल्फीकुमार बाजेवाला ही मालिका बनवण्यात आली होती. याच मालिकांचा रिमेक असणारी तुझेच मी गीत गात आहे ही नवी मराठी मालिका बनवण्यात आली आहे. मालिकेतून उर्मिला कोठारे आणि अभिजित खांडकेकर प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. उर्मिला या मालिकेत वैदेहीचे पात्र साकारत आहे. स्वराच्या आई वडिलांच्या भूमिकेत हे दोघेही झळकणार आहेत.
या मालिकेत स्वराची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे बालकलाकार ‘अन्वी तायवडे’ हिने. अन्वी हिची ही पहिलीच मराठी मालिका असणार आहे. या मालिके अगोदर अन्वीने हिंदी मालिका सृष्टीत बालकलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अन्वी तायवडे ही ८ वर्षाची असून नागपूर येथे तिचे कुटुंब वास्तव्यास आहे. आई श्वेता अन्वीला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते. त्यामुळे खूप लहान असल्यापासूनच अन्वीला स्वतःची ओळख मिळाली आहे. स्टोरी ९ मंथस की या सोनी टीव्हीवरील हिंदी मालिकेतून अन्वीला अभिनयाची संधी मिळाली होती. स्टार प्लस वरील ये है चाहतें या हिंदी मालिकेत तिने साचीचे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर अन्विने आपली पाऊले मराठी सृष्टीकडे वळवली.
‘कुलूप’ या आगामी मराठी चित्रपटात अन्वीला भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ रुद्र कर्पे यांनी केले आहे. चित्रपटात काम करणाऱ्या अन्वीला बालकलाकार म्हणून मिळालेल्या संधीने मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचता येणार आहे. महत्वाचं म्हणजे उर्मिला कोठारे आणि अभिजित खांडकेकर या कलाकारांसोबत तिला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे तिच्यासाठी ही पहिली वहिली मराठी मालिका खूपच खास ठरणार आहे. मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून शूटिंग सेटवर या कलाकारांचे छान बॉंडिंग जुळून आले आहे. अन्वीसाठी सेटवरचा वावर तितकाच खेळीमेळीचा असणार आहे. स्वराच्या भूमिकेसाठी आणि पहिल्या वहिल्या मराठी मालिकेसाठी अन्वी तायवडे हिचे खूप खूप अभिनंदन!