आपले मनोरंजन करणारे चित्रपट टेलिव्हिजन कलाकारां इतकेच देशाचे संरक्षण करणारे जवान सर्वांचे आदर्श आहेत. ऐन सणात देखील त्यांच्या खांद्यावर देश सुरक्षित ठेवण्याची जिम्मेदारी नेहमीच असते. देशाच्या सीमेवर अविरत खडा पहारा देणाऱ्या आपल्या भारतीय जवानांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान जम्मू कश्मीरच्या सीमेला लागून असलेल्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचले.
दरवर्षी पंतप्रधानांच्या आगमनाने जवानांचा उत्साह द्विगुणित होत आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून दरवर्षी दिवाळीत सैनिकांना भेटण्यासाठी सीमावर्ती भागात भेट देतात. याची सुरुवात त्यांनी सियाचीनला भेट देऊन केली होती. हा क्रम अखंड चालू आहे, ट्विटर हॅन्डलवर नौशेरा येथील लष्कराच्या चौकीवर उपस्थित असलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे शेअर केली आहेत. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर पंतप्रधानांनी जवानांची भेट घेऊन त्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ते पंतप्रधान म्हणून नव्हे तर जवानांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून नौशेरा येथे आपल्या शूर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करायला मिळाली याचा विशेष आनंद व्यक्त केला. या प्रसंगी आपल्या साथीदारांना धैर्याने मार्गदर्शन करीत, आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आयुष्य वेचले अशा कॅप्टन बलदेव सिंह आणि कॅप्टन बसंत सिंह यांना विशेष सन्मान करण्यात आला..
पूर्वी देशाला प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रातील आयातीवर अवलंबून राहावे लागत होते, परंतु सरकारच्या प्रयत्नांमुळे स्वदेशी बनावटीच्या सैन्याला अतिआवश्यक वस्तूंच्या निर्मितीला चालना मिळाली आहे. बदलत्या आधुनिक जगाला आणि युद्धाच्या नवनवीन पद्धतींना अनुसरून देशाची लष्करी क्षमता वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सीमाभागात दळणवळणाच्या सुविधा आणि लष्कराच्या सतर्क हालचाली वाढवण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांचा विकसित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आप्त स्वकीयांपासून दूर सीमेवर रक्षण करणाऱ्या या जवानांसाठी देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीची प्रत्यक्ष भेट आपुलकीची आणि खूप सारी ऊर्जा देणारी आहे.