स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावल्याने या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा या मालिकांना मागे टाकत ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील इतर सहाय्यक पात्रांचा सहजसुंदर अभिनय ही देखील जमेची बाजू म्हणावी लागेल. तूर्तास सायली आणि अर्जुनच्या लग्नानंतर सायलीला अजूनही त्याच्या घरच्यांनी स्वीकारलेले नसते. घरातील सदस्यांची विशेष करून पूर्णाईचे मन जिंकून घेण्यासाठी सायलीला मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे.
सायलीच्या या कामात तिला विमलची मोठी साथ मिळत आहे. अर्जुनच्या घरी आल्यापासून विमलची तिला साथ मिळाली आहे. विमल ही मोलकरीण असली तरी ती या घरातील एका सदस्या सारखीच वावरत असते. त्यामुळे घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे स्वभाव गुण विमलला चांगले ठाऊक आहेत. ती सायलीला वेळोवेळी सांभाळून घेताना दिसते. त्यामुळे विमलची भूमिका प्रेक्षकांना देखील विशेष भावली आहे. हे पात्र साकारले आहे अभिनेत्री मयुरी मोहिते हिने. आज मयुरीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मयुरी मूळची मुंबईची, साठ्ये कॉलेजमधून तिने कॉमर्स विषयातून शिक्षण घेतले. शाळेपासूनच मयुरीला अभिनयाची गोडी निर्माण झाली. यातूनच ती पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली. राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य यातून सहभागी झाल्यानंतर मयुरीच्या भूमिकेचे मोठे कौतुक करण्यात आले.
पोरका या नाटकाचे तिने दिग्दर्शन केले होते. मोलकरीणबाई, कन्यादान, डॉ डॉन मालिकांमधून मयुरीच्या अभिनयाला वाव मिळत गेला. काही जाहिरांतींमध्ये झळकण्याची तिला नामी संधी मिळाली. १५ ऑगस्ट चित्रपट, अनुराधा वेबसिरीजमध्ये मयुरी झळकली आहे. अनुराधा मधील तिच्या भूमिकेचे संजय जाधव यांनी मोठे कौतुक केले होते. तर पृथ्वी थिएटर्सशी जोडली असल्याने मकरंद देशपांडे यांनीही मयुरीच्या कामचं वेळोवेळी कौतुक केलं होतं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज अशा माध्यमातून मयुरीला अभिनयाची संधी मिळत गेली. ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत तिला विमलची भूमिका मिळाली आहे. ही भूमिका सकारात्मक असल्याने आणि सायलीच्या बाजूने असल्याने प्रेक्षकांना तिची भूमिका भावते. विमलच्या भूमिकेसाठी मयुरीचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
Thanku so much maza kavtuk karnya sadhi thanku 😇😇🙏🙏
धन्यवाद