युवीन कापसे दिग्दर्शित थकाबाई या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात शुभंकर तावडे एका गूढ भूमिकेत पाहायला मिळत आहे, तर अभिनेत्री हेमल इंगळे नायिकेची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे नाव पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. थकाबाई हे नेमकं काय आहे? यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तर अनेकांनी या नावाचा संदर्भ नायकाशी लावलेला पाहायला मिळाला. मात्र या नावामागची कथा स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शक युवीन कापसे यांनी उलगडले आहे. युवीन कापसे यांनी या चित्रपटाच्या अगोदर गायक म्हणून या सृष्टीत पदार्पण केले होते. हिंदी सृष्टीत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती.
युवीन या चित्रपटाबद्दल म्हणतो की, महाराष्ट्रीयन म्हणून माझा दिग्दर्शक असलेला पहिला प्रोजेक्ट हा मराठीतूनच असावा अशी इच्छा होती. थकाबाई हे नाव माझ्या खूप जवळचं आहे, कारण चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील गावात मी लहानाचा मोठा झालो. थकाबाई हे नाव गावातल्याच तलावाचं आहे. या तलावाच्या बाबतीत अनेक गूढ कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्यांच्याकडूनही आम्ही खूप गोष्टी ऐकायचो. त्यातूनच मला या चित्रपटाची कथा सुचली. ह्या चित्रपटात ६० टक्के वास्तवदर्शी आहे तर ४० टक्के काल्पनिक कथा आहे. थकाबाई ही एक रहस्यमयी कहाणी आहे. ज्यात तुम्हाला थ्रिलर आणि मिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. अर्थात थकाबाई हे एका व्यक्तीचंही नाव असू शकतं.
ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कथानकाचे गूढ उलगडेल. येत्या दोन महिन्यातच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यात वाघ, अस्वल सारखे हिंस्र प्राणी आहेत. आणि ते जिथं आहेत अशाच ठिकाणी आम्ही हे चित्रपटाचं शूटिंग करणार आहोत. माझं गावच अशा ठिकाणी वसलेलं आहे. त्यामुळे गावच्या लोकांचा जीवनप्रवास किती थ्रिलिंग असतो हे मला चित्रपटातून दाखवायचं आहे असे युवीन म्हणतो. थकाबाई नावावरूनच हा चित्रपट काय असेल असा एक चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांची ही उत्सुकता शेवटपर्यंत अशीच टिकून राहील असा विश्वास युवीनला आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. माझाही चित्रपट एक आगळा वेगळा विषय घेऊन येत आहे प्रेक्षक त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे असे तो म्हणतो.