आज ४ सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ८ वाजता प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. तर राज हंचनाळे हा अभिनेता तेजश्रीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर यांच्याही या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका आहेत. अपूर्वा नेमळेकर या मालिकेतून विरोधी भूमिका साकारत आहे. मुक्ता आणि सागर दोघेही शेजारी शेजारी पण या दोघांच्याही घराचा ३६ चा आकडा आहे.
मुक्ताची आई आणि सागरची आई दोघींमध्ये सतत मजेशीर वाद होत असतात. त्यामुळे ही धमाल अनुभवायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. अशातच या मालिकेतून तेजश्रीला एक नवीन नाव मिळणार आहे. सागरची आई तेजश्रीला कढीपत्त्याची काडी असे म्हणून नावं ठेवत असतात. आलीच ही कढीपत्त्याची काडी असे संवाद या मालिकेतून तुम्हाला अनेकदा ऐकायला मिळणार आहेत. हे नाव देण्यामागे संजीवनी जाधव यांनी एक कारण देखील सांगितलं आहे. तेजश्री अगदी बारीक आहे सेम कढीपत्त्याच्या काडीसारखीच. ती दिसायलाही छान आहे म्हणून मी तिला सतत याच नावाने हाक मारणार आहे.
अर्थात तेजश्री सुद्धा या गमतीजमतीचा भाग बनणार आहे. आपल्याला मालिकेत दिलेल्या या नावावरून आता मला महाराष्ट्रातील लोक सुद्धा याच नावाने ओळख देतील अशी प्रतिक्रिया तिने यावर दिली आहे. मला आता महाराष्ट्रातील लोक कढीपत्त्याची काडी म्हणूनच हाक मारतील की काय, असे ती मिश्किलपणे सांगते. तेव्हा या मालिकेतील ही नोकझोक पाहायला प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक असणार आहेत. नुकताच रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्या जागी आता प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची पसंती नक्कीच मिळवणार याची खात्री वाटते.