वर्ष २०१९ मधील डिसेंबर महिन्यात या नटसम्राटाचा वृध्दापकालाने मृत्यू झाला खरा पण त्यांनी अभिनयाद्वारे साकारलेली प्रत्येक कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या स्मृतीतून नष्ट होणे कदापी शक्य नाही. तसेच कला क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांच्या सन्मान प्रित्यर्थ तन्वीर नाट्यधर्मी हा त्यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार विशेष प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी हा छोटासा लेख.. १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे डॉ बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू यांच्या पोटी डॉ. श्रीराम लागू यांनी जन्म घेतला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय येथे पूर्ण केले. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली. कॅनडा येथे जाऊन त्यांनी पुढील पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विविध नाटकांत काम केले होते. डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, नाक, घसा शल्यविशारद परंतु आपला व्यवसाय सोडून ते अभिनयाकडे वळले, चित्रपटांपेक्षाही नाटकांतून प्रेक्षकांसमोर बिना रिटेक करावा लागणार अभिनय प्रयोग त्यांना जास्त आवडे. १५० हुन अधिक हिंदी मराठी चित्रपट, ४० हुन अधिक हिंदी, मराठी, गुजराती व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. सिंहासन, पिंजरा, झाकोळ या चित्रपटां सोबत हिमालयाची सावली, नटसम्राट, वेड्याचे घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस, गिधाडे ही नाटके त्यांनी आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवली.
डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यादेखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. त्यांना ‘तन्वीर’ नावाचा मुलगा होता, ९ डिसेंबर १९७१ सालचा तन्वीरचा जन्म. कामानिमित्त तो पुणे मुंबई मार्गे रेल्वेने प्रवास करीत होता. खिडकी शेजारी बसून पुस्तक वाचत असताना बाहेरून कोणीतरी फेकलेला दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे जोरदार आघात होऊन तन्वीर कोमामध्ये गेला; त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान एका आठवड्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ह्या धक्क्यातून डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांना सावरणे खूप कठीण होते. तन्वीरच्या आठवणीत त्याच्या जन्मदिनी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी “तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार” नावाने जेष्ठ नाट्यकर्मींना त्यांच्या विशेष योगदानासाठी पुरस्कृत केले जाते. यातून भारतभरातील रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या रूपवेध या संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार आजवर इब्राहिम अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, पंडित सत्यदेव दुबे, सुलभा देशपांडे, गिरीश कर्नाड, कै. गो. पु. देशपांडे, बिनकामाचे संवाद (नाटक), द थिएटर ग्रुपचे अलेक पदमसी, विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता, कांचन सोनटक्के (नाट्यशाळा ट्रस्ट), चेतन दातार, गजानन परांजपे, वीणा जामकर, प्रदीप वैद्य, नाट्य निर्माते वामन पंडित, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नसीरुद्दीन शहा, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे. कोणी एका उनाड मुलाने रेल्वेच्या दिशेने भिरकावलेला दगड एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करू शकते, हे मुळात त्याच्या लक्षात कसे येऊ शकत नाही याचीच मोठी शोकांतिका वाटते. या कृत्याने आपण कोणाचा जीव तर घेत नाही ना; याची अशा भरकटलेल्या तरुणांना जाण होणे आवश्यक आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना समजवणे आणि दुर्घटनेची जाणीव करून देणे खूपच गरजेचे आहे.