आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी घडतात, आपण त्या व्यक्तीचे डोळे, हसणं, आवाज सगळ्या गोष्टींनी वेडे होतो.. त्याची एखादी झलकही अख्ख्या दिवसाचा मूड पालटायला पुरेशी असते, त्यामुळे फार जपून पाऊल टाकायला हवं! असा कोणीतरी जो माझ्या फक्त शरीराला नाही मनाला स्पर्श करू शकेल! असा कोणीतरी ज्याच्या नजरेत माझ्याबद्दलचं कौतुक मावणार नाही, आणि मी दिसल्यावर त्याच्या डोळ्यात उमटलेलं हसू विरणार नाही..
असा कोणीतरी ज्याला माहिती असेल मला अशीच कॉफी आवडते, स्ट्रॉंग! आणि ती पिताना माझ्या ओठावर आलेली फेसाची मिशी तो अलगद पुसून टाकेल. दोन झुळुका आल्या दोन दिशांनी आणि इतकी घट्ट मिठी मारली, इतकी घट्ट, की हवाही जाऊ नये मधून! आज नक्की काय झालंय.. चकित झालात ना, हे आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीने लिहिलेल्या कवितेतील एकत्रित ओळी. आहे कि नाही भन्नाट! एखाद्या स्वप्नसुंदरीने आपल्या अपेक्षा नजाकतीने सुवासिक वेणीत गुंफल्यावर दुसरं कशातच लक्ष लागणार कसं. चला तर मग थोडेसें जाणून घेऊया या मनमोहक अदांच्या अष्टपैलू अभिनेत्री, कवयित्री, गालावर खळी खुलणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याबद्दल.. होय बरोबर ओळखलंत.. स्पृहाच! स्पृहा शिरीष जोशी मराठी चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील बोलक्या डोळ्यांची प्रतिभावंत अभिनेत्री. स्पृहा अग्निहोत्र, आभाळमाया, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बाँबे लॉयर्स, सत्यमेव जयते, स्ट्रगलर्स मालिका आणि चित्रपट तसेच सूर नवा ध्यास नवा, किचनची सुपरस्टार कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
आपल्या सहज अभिनयाने स्पृहाने लाखो रसिकांची मने जिंकलीच आहेत, पण कवितांच्या माध्यमातून तिने हृदयेही जिंकली. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे ती सध्या सूत्रसंचालन करत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवली आहे. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. स्पृहाला छंद म्हणून लिखाण करायला आवडतं, तिचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कविता शेअर करताना तिला वेगळा आनंद मिळतो हे प्रकर्षाने जाणवते. तिने लिहिलेल्या कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवल्या. तसेच बा. भ. बोरकरांची लावण्य रेखा, कुसुमाग्रजांची प्रवासी पक्षी, मो. दा. देशमुख यांची ऊन ऊन खिचडी, कविवर्य विंदा करंदीकरांची किलबिललेले उजाडताना, आरती प्रभूंची समईच्या शुभ्र कळ्या, बा. सी. मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा, अरुण कोलटकरांची वामांगी, गीत चतुर्वेदीची जिसके पीछे पड़े कुत्ते, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक दैवत पु. ल. देशपांडे, वसंत बापट, स्वा. वि. दा. सावरकर यांच्याही कवितांच्या फर्माईशी सोशल मीडियाच्या माध्यमातून गाजविणारी ही एकमात्र अभिनेत्री असावी.
स्पृहाला अक्षरगंध प्रकाशनतर्फे कुसुमाग्रज, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा कलागौरव, कलारंग सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव, सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री, साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप अशा नानाविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्पृहाला शॉपिंग करायला आणि इंडियन, वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे घालायला अतिशय आवडतं. तिला मनापासून साड्या नेसायला आवडतात, अगदी पैठणी, कांजिवरम पासून ते चंदेरी अशा सगळ्या प्रकारच्या साड्यांमधून ती खुलून दिसते. कॉटन आणि लिनन मटेरिअलच्या साड्यांवर तिचे विशेष प्रेम आहे. स्पृहाच्या आईने, आजीने किंवा सासूबाईंनी नेसलेल्या जुन्या साड्या नेसायला तिला प्रचंड आवडतात, त्यात तिला नेहमी एक वेगळ्या प्रकारची ऊब जाणवते. फॅशनच्या झगमगत्या दुनियेत सूत्रसंचालन कसे करावे याचे उत्तम व एकमेवद्वितीय उदाहरण म्हणजे स्पृहा.. विनाकारण अंग प्रदर्शन नाही की वेडे वाकडे डान्स नाही, लहानांशी लहान होऊन तर मोठ्यांशी अदबीने त्यांचा प्रत्येक शब्द झेलत पारंपरिक वेशभूषेतही दिलखुलासपणे स्टेजवर हसतमुखाने वावरणे हे फक्त आणि फक्त स्पृहालाच जमू शकते.