गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीतील बऱ्याचश्या कलाकारांना शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने काही महिन्यांपूर्वी छोटीशी सर्जरी करून घेतली होती. विश्रांतीनंतर ती पुन्हा मालिकेत रुजू झाली. मधुराणी पाठोपाठ याच मालिकेची अभिनेत्री रुपाली भोसले हिच्यावर देखील शास्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यानंतर चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे याला देखील नाटकाचा प्रयोग रद्द करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले होते. अर्थात शारीरिक तक्रारी ह्या वेळी अवेळी जेवणामुळे, झोप पूर्ण न झाल्यामुळे, सततच्या कामाच्या ताणामुळे उदभवू लागतात.
या गोष्टींकडे थोडेही दुर्लक्ष झाले की मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. रुपाली भोसले आणि सागर कारंडे यांच्याही बाबतीत असेच घडले. कामाचा ताण, वेळीअवेळी जेवण आणि प्रकृतीकडे छोट्या छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले की शरीराला व्याधी जडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्या तब्येतीकडे वेळीच लक्ष्य द्यायचे हे या दोघांनी आपल्या अनुभवातून सांगितले होते. मात्र आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री देखील अशाच काही कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे. या मालिकेतील मीनाक्षी मामीची भूमिका स्वाती देवल हिने साकारली आहे. स्वाती ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत कार्यरत आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत तिची काहीशी विरोधी भूमिका आहे त्यामुळे प्रेक्षकांना तिच्या भूमिकेचा राग येतो.
अर्थात विरोधी भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागते हीच त्यांच्या सजग आभिनयाची पावती ठरत असते. परंतु आता स्वातीने आरोग्याच्या कारणास्तव या मालिकेतून किमान दोन आठवड्यासाठी तरी ब्रेक घेतलेला आहे. सेटवर घरून डबा नेणाऱ्या स्वातीला जंक फूड खाणं महागात पडलं आहे यामुळे काही दिवसांपासून तिला त्रास जाणवू लागला होता. यामुळे नुकतीच तिच्यावर छोटीशी शास्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना स्वाती म्हणते की, कालच एक छोटी सर्जरी झाली माझी, आता मी ओके आहे. स्वामींची कृपा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचे प्रेम ह्यामुळेच हे शक्य झाले. स्वामी दत्त कृपा तर वेळोवेळी मिळते मला. पण विशेष म्हणजे ह्या वर्षी जाणते, अजाणते पणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळालेत.
हे ते पुण्य अस कामी येतं, मी मनापासून तुमची आभारी आहे. पण खरंच आपणच आपल्या शरीराची काळजी, पर्वा केलीच पाहिजे, दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे. पूर्वी जंक food म्हणजे घरी आई बनवायची रोजच्या जेवणा व्यतिरिक्त ते. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करण्याचा कंटाळा कसला हो. कुठे थांबायचं, शरीरचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वतःला समजायला हवं. मध्ये रुपाली भोसले मैत्रिणी, तशी मी घाबरटच पण तुझी पोस्ट वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला. नवरा तर सेवेत हजर होता, भाग्य लाभत बरं का असा नवरा मिळायला. पण खरंच तुषार ने अगदी पेज बनवून भरवण्यापासून, ते पाय दाबून देणे,अगदी सर्व सेवेत हजर होता. लव्ह यू तुष्की.