आभाळमाया या लोकप्रिय मालिकेतील चिंगी म्हणजेच अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे हिला नुकतीच पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेतून स्वरांगीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. पोरबाजार सारख्या मराठी चित्रपटात झळकलेल्या स्वरांगीने बॉलिवूड सृष्टीतही काम केले आहे. बाजीराव मस्तानी या बॉलिवूड चित्रपटात तिला अभिनयाची नामी संधी मिळाली होती. स्वरांगीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. गाण्याची तिची ही आवड वेगवेगळ्या कार्यक्रमात पहायला मिळते. स्वरांगी बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावरील काही सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले होते.

स्वरांगी मराठे आणि निखिल काळे यांचे २०१६ साली अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. भव्य दिव्य लग्न न करता, कुठलाही गाजावाजा न करता मोजक्याच मित्रमंडळी आणि नातेवाईकांना आमंत्रित करून अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा त्यांनी मानस केला होता. लग्नसोहळ्याला होणारा अवास्तव खर्च वाचवून तो निधी त्यांनी एका अनाथ आश्रमाला देणगी म्हणून दिला होता. अर्थात निखिलला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील हा प्रस्ताव मान्य होता. त्यामुळे जवळपास सहा ते सात लाख रुपये त्यांनी आश्रमाला भेट दिली होती. स्वरांगी काही वर्षांपासून या आश्रमातील मुलांना गाणं शिकवायला जायची. यातूनच तिला या मुलांचा लळा लागला होता. स्वरांगी आणि निखिल यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव सोयरा.

सोयरा आता तीन ते चार वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली असून मुलाचे नाव त्यांनी ‘सुहित’ असं ठेवलं आहे. सुहित या नावाचा अर्थ सकारात्मक, छान असा आहे. सुहितच्या जन्माने स्वरांगी दुसऱ्यांदा मातृत्वाचा अनुभव घेत आहे. सोयरा आणि सुहितच्या पालनपोषनात व्यस्त असल्याने तिने काही काळासाठी ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. मात्र गाण्याला आपला श्वास मानणारी स्वरांगी पुढे तेवढ्याच उत्स्फूर्तपणे कलाक्षेत्रात पदार्पण करेल अशी आशा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. स्वरांगिला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याबद्दल तिचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. आणि तिच्या बाळालाही सुदृढ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.