चला हवा येऊ द्या या शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, अंकुर वाढवे या कलाकारांनी शोमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत प्रहसन सादर करून त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. शोमध्ये वेगवेगळे पर्व आणण्यात आले, कधी सेलिब्रिटींचे पर्व रंगले तर कधी नवख्या कलाकारांना एक चांगली संधी मिळवून दिली. स्नेहल शिदम हि एका पर्वाची विजेती ठरली होती. त्यामुळे या शोमध्ये आणखी एक नवीन पर्व आणण्यात आले आहे. येत्या १५ मे पासून चला हवा येऊ द्या, लहान तोंडी मोठा घास या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
मोठ्या कलाकारांसोबत शोमध्ये आता चिमुरड्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. ही चिमुरडे सेलिब्रिटी त्यांच्या निरागस अभिनयातून प्रेक्षकांना हसवणार आहेत. तेव्हा या पर्वात सर्वांची लाडकी मायरा वायकुळ हिची देखील एन्ट्री होत आहे. तू चाल पुढं मालिकेतील चिमुरडा रेयांश जुवाटकर हा देखील या पर्वात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोबतच एक स्टार कीड सुद्धा या शोचा भाग असणार आहे. चला हवा येऊ द्याचा संगीत दिग्दर्शक तुषार देवलच्या मुलाची या शोमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. तुषार आणि स्वाती देवल यांचा मुलगा स्वराध्य देवल सध्या चला हवा येऊ द्या च्या सेटवर धमालमस्ती अनुभवताना दिसणार आहे. स्वराध्यला संगीताची आवड आहे, तो खूप लहान असल्यापासूनच तुषार सोबत वाद्य वाजवायला शिकला.
स्वराध्याची थाप तबल्यावर आता चपखल बसते त्यामुळे गावच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून तो तुषार सोबत वाद्य वाजवताना दिसतो. आई वडील यांच्या सोबत बऱ्याचशा रील मध्येही तो सहभागी होतो. स्वराध्यचे हावभाव आणि प्रतिक्रिया देण्याची शैली खूपच अनोखी आहे. आई स्वाती प्रमाणे तो आता अभिनय क्षेत्रातही स्वतःची ओळख बनवू पाहत आहे. चला हवा येऊ द्या मुळे त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळणार आहे. पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर स्वराध्यचे आगमन होत असल्याने थोडेसे दडपण तर आहेच. मात्र टीव्हीवर झळकण्याची तेवढीच उत्सुकता देखील त्याच्यात पाहायला मिळते. अभिनय क्षेत्रातील या पदार्पणसाठी स्वराध्यला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत. या शोमधून तो प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकू शकेल असा विश्वास आहे.