स्वप्नील जोशी सध्या वाळवी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाळवी चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीत तो सव्वा कोटींची गाडी खरेदी करण्याचा एक किस्सा सुद्धा सांगताना दिसतो आहे. दुनियादारी, चेक मेट, मितवा, तू ही रे, मुंबई पुणे मुंबई आणि अशा कितीतरी चित्रपट मालिकेतून स्वप्नील जोशी एक चॉकलेट हिरो म्हणून मराठी सृष्टीत लोकप्रिय झाला आहे. या यशाच्या प्रवासात त्याने सव्वा कोटींची गाडी खरेदी करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. डिसेंबर २०२१ मध्ये जॅग्वार आई पेस इलेक्ट्रीक ही तब्बल सव्वा कोटींची कार त्याने खरेदी केली होती.
मराठी सृष्टीत एवढी महागडी कार खरेदी करणारा तो एकमेव अभिनेता म्हणून चर्चेत आला होता. ही कार घेण्याचा किस्सा नुकताच त्याने शेअर केला आहे. खरं तर स्वप्नीलला दुसऱ्याच एका महागड्या गाडीची खरेदी करायची होती. त्यासाठी तो आपल्या बाबांसोबत शोरूममध्ये गेला होता. ज्या गाडीची चौकशी करण्यासाठी तो तिथे गेला तिथेच ही इलेक्ट्रॉनिक कार सुद्धा तिथे होती. स्वप्नीलच्या बाबांची नजर त्या गाडीकडे गेली. त्यांनी स्वप्नीलला ही गाडी खरेदी करण्याचे सांगितले. तेव्हा ही गाडी त्याने परदेशात पाहिली होती, त्याला ती आवडली सुद्धा होती. मात्र भारतात ती लॉन्च सुद्धा झालेली नव्हती. ही भारतात मिळत नाही असे त्याने बाबांना सांगितले, तेव्हा विचारायला काय हरकत आहे? म्हणून ते गाडीची चौकशी करण्यासाठी गेले.
तेव्हा अशी गाडी मिळेल पण त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील असे उत्तर त्यांना मिळाले. तेव्हा स्वप्नीलचे बाबा त्याला म्हणतात की, असुदे महाग नाहीतरी तू इलेक्ट्रॉनिक गाडी घेणारच होतास. तू एवढी मेहनत करतोयस मग निदान गाडी तरी अशी घे जी कोणाकडेच नसेल. माझ्या बाबांमुळेच ही गाडी मी खरेदी करू शकलो. त्यांच्यामुळेच मी एवढी मोठी झेप घेऊ शकलो, नाहीतर ही गाडी खरेदी करणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते. असे म्हणत तब्बल सव्वा कोटींची मुंबईत लॉन्च झालेली पहिली गाडी खरेदी करण्याचा मान पटकावला. स्वप्नील जोशीकडे सध्या तू तेव्हा तशी या मालिकेसोबतच वाळवी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. यासोबतच चला हवा येऊ द्या सारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी तो काम करतो. त्यामुळे स्वप्नील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत यशाचा एकेक टप्पा सर करताना दिसत आहे.