स्वाभिमान शोध अस्तिवाचा या मालिकेत नुकतेच शांतनू आणि पल्लवीने लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांतनू आणि पल्लवीचे लग्न कधी होणार याकडे प्रेक्षक वाट पाहून होते. निहारिका सोबत शांतनूचे लग्न जुळले होते तर पल्लवी देखील गौरव सोबत लग्नाला तयार झाली होती. मात्र ऐन लग्नाच्यावेळी शांतनूने पल्लवीकडे जाऊन गौरव बद्दलचा खुलासा केला. नंदिताची डायरी घेऊन तो पल्लवीला सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. ताईच्या डायरीतील सत्य वाचून पल्लवीचे डोळे उघडतात. नंदिताने गौरवबद्दल सर्व काही त्या डायरीत लिहिलेले असते. गौरव किती नीच माणूस आहे, दुसऱ्या मुलीला तो घरात घेऊन येतो.

माझ्या बाळावर देखील गौरवने संशय घेतला, हे बाळ शांतनूचं आहे असे तो म्हणाला. या माणसाचा काहीच भरवसा नाही, भविष्यात जर माझा मृत्यू झाला तर हाच माणूस माझ्या मृत्यूला जबाबदार असेल असे सर्व त्या डायरीत लिहिलेले असते. ताईच्या बाळासाठी पल्लवी गौरवसोबत लग्नाला तयार झालेली असते. मात्र हा गौरव किती नीच माणूस आहे हे डायरीतून तिला उलगडतं. हे सर्व शांतनू तिला सांगतो तेव्हा गौरव शांतनू वर चिडतो. ते पाहून पल्लवी ताईच्या मृत्यूचा गौरवला जाब विचारते आणि गौरवला कानशिलात लगावते. गौरवला आता पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे पल्लवीचे आई बाबा यांनी देखील निश्वास टाकला आहे.

गौरवसोबत पल्लवीचे लग्न लावून आपण चूक करत होतो याचा देखील त्यांना उलगडा झाला. तर इकडे लग्नासाठी निहारिका शांतनूची वाट पाहत असते. तो कुठे गेलाय हे कोणालाच माहीत नसल्याने ती कासावीस होते. आमचं लग्न होऊ नये म्हणून हा एक प्लॅन तर नसेल ना असे ती संशयाने बोलून दाखवते. तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू लग्न करून इथे येतात तेव्हा त्या दोघांना पाहून मोठ्या काकांना धक्काच बसतो. ते पल्लवीला घराचा उंबरठा ओलांडण्यास नकार देतात. तेव्हा सुपर्णा काकांना थांबवते आणि मीच शांतनूला पल्लवी सोबत लग्न करण्यासाठी पाठवलं होत हा धक्कादायक खुलासा करते.
जेव्हा पल्लवी आपल्या बहिणीच्या बाळासाठी गौरव सोबत लग्न करण्याचा निर्णय घेते त्याच वेळी तिने माझं मन जिंकलेलं होतं. आणि म्हणूनच मी शांतनूला तिच्यासोबत लग्न करण्यास सांगितलं असे सुपर्णा सांगते. मोठ्या काकांच्या विरोधाला डावलून प्रभाकर आणि सुपर्णा पल्लवीला घरात घेतात. त्यामुळे आता यामागे सुपर्णाचा नेमका कुठला नवा प्लॅन असणार आहे हे येणाऱ्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परंतु सध्या तरी पल्लवी आणि शांतनूचे लग्न झालेले पाहून प्रेक्षकांनी देखील निश्वास टाकलेला पाहायला मिळतो आहे.