मिलिंद गवळी, अल्का कुबल, अशोक शिंदे, शरद पोंक्षे, मोहन जोशी मराठी सृष्टीतील या लोकप्रिय कलाकारांची मूलं अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमावताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील या सर्वांचे कौतुक केलेले पाहायला मिळते. नुकतेच सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने देखील अभिनय क्षेत्रात न येता हॉटेल व्यवसायात आपले नशीब आजमावलेले पाहायला मिळते आहे. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे हा शेफ आहे. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्याने सहभाग दर्शवला होता. काही काळ तो अमेरिकेतही शेफ म्हणून कार्यरत होता.
मात्र आता भारतात येऊन त्याने हॉटेल व्यवसायात उतरण्याला प्राधान्य दिलेले पाहायला मिळत आहे. ‘मharaj’ या नावाने मिहीर पाठारे आणि त्याचा मित्र आदेश वाघमारे या दोघांनी मिळून फूड ट्रक सुरू केला आहे. या फूड ट्रकमध्ये ठाण्यातील खवय्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली पावभाजी चाखता येणार आहे. ठाण्यात पोखरण रोड नंबर २, बिरसा मुंडा चौकाजवळ, कोकणीपाडा ठाणे पश्चिम येथे हा व्यवसाय त्याने सुरू केला आहे. अंशुमन विचारेची पत्नी आणि मराठी सेलिब्रिटींनी त्याच्या या फूड ट्रकला सदिच्छा भेट दिली असून ही चविष्ट पावभाजी त्यांनी चाखली आहे. मिहिरला या व्यवसायानिमित्त मराठी सेलिब्रिटींनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रिया पाठारे यांनी मराठी चित्रपट, मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून माईची भूमिका निभावत आहेत. फु बाई फु या शोमध्ये त्यांनी भाऊ कदम सोबत अनेक विनोदी प्रहसन सादर केले होते. विनोदाचे अचूक टायमिंग हेरणाऱ्या सुप्रिया पाठारे यांनी गंभीर तसेच खलनायिका ढंगाच्या भूमिका तितक्याच सहजेतेने साकारलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे बहुतेकदा त्या अशाच भूमिकांमध्ये जास्त रुळतात. आपल्या मुलाने अभिनय क्षेत्रात न येता व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवल्याने त्यांनाही मिहिरचा अभिमान वाटत आहे. मिहिरच्या व्यवसायाला दिवसेंदिवस भरभराटी मिळो हीच एक मनापासून सदिच्छा.