ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक झाला आहे. सुप्रिया पाठारे यांच्या आई कविता मालगुंडकर यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत अस्वास्थ्य जाणवत होते. काल ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रिया पाठारे या त्यांच्या आईच्या खूपच क्लोज होत्या. आई असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर आईचा एक फोटो शेअर केला आहे. ही दुःखद बातमी कळताच सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. तर अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारे हिने त्यांना स्वतःला सावरण्याचे बळ दिले आहे.
सुप्रिया पाठारे यांचे बालपण अतिशय खडतर प्रवासातून गेले आहे. वडिलांचे खूप आधीच निधन झाल्याने सुप्रिया पाठारे यांचे बालपण अतीशय हलाकीच्या परिस्थितीत गेले होते. खरं तर त्यांच्या घरात सगळ्याच मुली असल्याने त्यांचे वडील या सर्व मुलींचा रागराग करायचे. पण आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे या मुलींनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक केले. घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आईसोबत जाऊन सुप्रिया यांनी अनेक घरची धुणीभांडी केली होती. तर कधी कधी शाळेत असताना त्यांनी रस्त्यावर जाऊन अंडी देखील विकली होती. आईच्या पाठिंब्यामुळेच पुढे त्या अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या होत्या. आज आईच्या आठवणीत सुप्रिया खूप भावूक झाल्या आहेत. आईच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. तर बहीण अर्चना नेवरेकर हिनेही ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी फु बाई फु मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. जागो मोहन प्यारे, ची व चिसौका, मोलकरीण बाई, श्रीमंता घरची सून अशा विविध मालिका आणि चित्रपटातून सुप्रिया नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिल्या. अभिनेत्री अर्चना नेवरेकर ही सुप्रिया पाठारे यांची सख्खी बहीण. चित्रीकरणाच्या सेटवर अर्चना नेहमी आपली बहिण सुप्रियासोबत जायची यातूनच तिला पुढे जाऊन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वहिनीची माया, सुना येती घरा अशा अनेक चित्रपटातून अर्चना एक नायिका, सह नायिका बनून प्रेक्षकांसमोर आली. सध्या अर्चना अभिनय क्षेत्रात कार्यरत नसली तरी संस्कृती कालादर्पणची ती अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. दरवर्षी या संस्थेमार्फत कलाक्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल मराठी कलाकारांना पुरस्काराद्वारे प्रोत्साहन दिले जाते.