वयाच्या ९३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेश देव यांनी हिंदी तसेच मराठी सृष्टीत जवळपास सहा दशके काम केलं आहे. यात २८६ हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३२ नाटकांचा समावेश आहे तर अनेक जाहीरातीतूनही त्यांनी काम केलं होतं.
सीमा देव यांच्याशी ते विवाहबद्ध झाले होते. रुपेरी पडद्द्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातली ही जोडी सदाबहार राहिली आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीत या कलाकार दाम्पत्याने अनेक सुंदर सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. अजिंक्य आणि अभिनय ही दोन अपत्ये त्यांना आहेत. अजिंक्य देवने आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी हिंदी सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे मात्र आपल्या मुलाला उच्च शिक्षण घेऊन परदेशात जायचे होते आणि ते काही कारणास्तव न झाल्याची खंत त्यांना कायम वाटत होती. अनेकदा त्यांनी मुलाखतीतून याबाबत त्यांची भूमिका सांगितली होती.
अमिताभ बच्चन आणि रमेश देव यांची मैत्री देखील खूप खास होती. ते नेहमीच रमेश देव यांच्या घरी भेट द्यायला यायचे. आनंद या चित्रपटात अमिताभ बच्चन, रमेश देव आणि राजेश खन्ना या त्रिकुटाने साकारलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले होते. रमेश देव यांनी अनेक दमदार भूमिका निभावल्या आहेत. बहुतेकदा त्यांच्या वाट्याला खलनायकी ढंगाच्याही भूमिका आल्या. त्या भूमिका देखील त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजवल्या होत्या. एक उत्कृष्ट नायक, सह नायक, आजोबा, वडील ते उत्कृष्ट खलनायक अशा सर्वच भूमिका त्यांनी लीलया पेलल्या होत्या. रमेश देव यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.