२ फेब्रुवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक देखणा आणि राजबिंडा अभिनेता हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. वयाच्या ९३ व्या वर्षी देखील त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवेल असाच होता. काही दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी झी मराठीवर सुरू झालेल्या हे तर काहीच नाय या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. हे तर काहीच नाय या मंचावर याअगोदर अनेक कलाकार आपले अनुभव शेअर करताना दिसले आहेत. मंचावर दाखल होताच रमेश देव यांनी सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे असे म्हणत स्वतःवर चित्रित झालेल्या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला.
त्यांच्या आयुष्यतील हे शेवटचे बहारदार क्षण झी मराठी वाहिनीने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आयुष्यातला हा सोनेरी क्षण प्रत्यक्षात पाहताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतील यात शंका नाही . शुक्रवारी ९.३० वाजता हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात रमेश देव आपल्या अनेक आठवणींना उजाळा देताना दिसणार आहेत. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत खरे आयुष्य जगणारा कलाकार म्हणून रमेश देव यांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. दोन दिवसांपूर्वीच स्वर्गीय रमेश देव यांच्या अस्थींचे विसर्जन पंचगंगेच्या पाण्यात करण्यात आले होते. त्यांची ही अखेरची ईच्छा होती की, ज्या कोल्हापूरच्या मातीत आपण जन्मलो, खेळलो वाढलो आपण बालपणी ज्या पंचगंगेच्या पाण्यात डुंबलो.
पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात उड्या मारल्या त्या पंचगंगेत आपल्या अस्थी विसर्जित केल्या जाव्यात. यानिमित्ताने रमेश देव यांची दोन्ही मुलं अजिंक्य देव आणि अभिनय देव त्यांच्या कुटुंबासह मुंबईहून कोल्हापूरला गेले होते. प्रयाग येथील पंचगंगेच्या संगमावर रमेश देव यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या होत्या. हे तर काहीच नायच्या मंचावरून रमेश देव यांनी कुठल्या आठवणींना उजाळा दिला होता. हे उद्याच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहीये असेच त्यांनी प्रत्यक्षात देखील अनुभवले होते असेच आता त्यांच्याबाबत म्हणावे लागेल.