५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराद्वारे सुपरस्टार रजनीकांत यांना सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा दादासाहेब फाळके हा पुरस्कार प्रदान केल्यावर रजनीकांत यांनी आपल्या बस ड्रायव्हर मित्राचे आभार मानले. ते म्हणाले, “कर्नाटकातील माझा मित्र आणि सहकारी राजबहादूर जो बस ड्रायव्हर आहे त्याचे मी आभार मानतो, कारण जेव्हा मी बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होतो त्यावेळी त्यानेच माझं अभिनय कौशल्य ओळखलं आणि मला चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं”.
रजनीकांत यांनी एकाहून एक असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आजही त्यांचा जलवा कायम आहे. रजनीकांत यांच्या सुपरहिट हिंदी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर दरबार, २.०, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, कबाली, खून का कर्ज, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा हे चित्रपट तुफान हिट ठरले. केवळ अभिनेताच नाही तर लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक करण्यात आले. रजनीकांत यांचा जन्म बंगलोर येथील एका मराठी कुटुंबात झाला, त्यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असं होतं तर आई गृहिणी आणि वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. शाळेत असताना नाटकांतून त्यांनी सहभाग दर्शवला होता. इथूनच त्यांना अभिनयाची आवड वाटू लागली. शालेय शिक्षणांतरही त्यांचे नाटकात काम करणे चालू होते. बंगलोरला त्यांनी बस कंडक्टरची नोकरी केली होती. यातूनच त्यांच्या बसचा ड्रायव्हर आणू मित्राने अभिनय क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहित केले.
सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट प्रियदर्शनच्या मल्याळम काळातील महाकाव्य मारक्कर लायन ऑफ द अरेबियन सीला मिळाला. मणिकर्णिका आणि पंगामधील अभिनयासाठी कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मनोज बाजपेयीला भोंसलेसाठी आणि धनुषला असुरनसाठी मिळाला. विवेक अग्निहोत्रीच्या द ताश्कंद फाईल्सला सर्वोत्कृष्ट संवाद आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दिवंगत सुशांत सिंग राजपूत अभिनीत छिछोरे हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. बी प्राक यांना त्यांच्या युद्ध नाटक केसरी मधील देशभक्तीपर गीतासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चॅटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई यासर्व निवड सदस्यांनी एकमताने रजनीकांत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याअगोदर के. बालाचंदर, अक्कीनेनी नागेश्वराराव यासारख्या ज्येष्ठ कलाकारांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.