सध्या कालासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकेत पाठक याची लगीनघाई सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी संकेत पाठक याला त्याची प्रेयसी म्हणजेच अभिनेत्री सुपर्णा श्याम हिने स्पेशल अंदाजात प्रपोज केले होते. तेव्हा त्यांनी हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला होता. नातेवाईकांच्या मदतीने सुपर्णाने संकेतला सरप्राईज देत हे प्रपोजल मांडले होते. त्यावेळी संकेतनेही तिला होकार कळवला होता. मात्र हे दोघेही लग्न कधी करणार याची विचारणा होऊ लागली. माध्यमांशी बोलताना संकेतने याबाबत एक हिंट दिली होती की, आम्ही दोघेही एप्रिल २०२३ मध्ये लग्न करणार आहोत. तेव्हा आता म्हटल्याप्रमाणे या दोघांचीही लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे.
येत्या शनिवारी म्हणजेच २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या दोघांच्याही लग्नाचा बार उडणार आहे. त्यामुळे संकेत आणि सुपर्णाच्या घरी लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झालेली आहे. मित्रमंडळी आणि जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी हा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित जमले आहेत. नुकतेच संकेतने कपाळावर मुंडावळ्या सजवून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत त्यांना आग्रहाने जेवायला बसवले. दोन दिवसांपूर्वी संकेत त्याच्या मित्रांसोबत गोव्याला ट्रिपसाठी गेला होता. तिथे त्याने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. तर इकडे सुपर्णा देखील आपल्या मैत्रिणींबरोबर स्पेशल ट्रीपला गेलेली होती. लवकरच त्यांच्या मेहेंदीचा सोहळा देखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर हळद आणि संगीत सोहळा रंगलेला पाहायला मिळणार आहे.
शनिवारी पुण्यामध्ये या दोघांचेही मोठ्या थाटात लग्न होईल. लग्नाला सेलिब्रिटी विश्वातील अनेक मित्रमंडळी आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळणार आहेत. लग्नातील नववधू वराचा त्यांचा लूक कसा असणार याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. २९ सप्टेंबर २०१६ रोजी दुहेरी मालिकेच्या सेटवर संकेत आणि सुपर्णाची पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री आणि त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दुहेरी नंतर हे दोघे आणखी एका मालिकेत एकत्रित झळकले होते. एकमेकांना डेट केल्यानंतर आता तब्बल ७ वर्षांनी हे लग्नबांधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. संकेत सध्या स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. लग्नानिमित्त काही काळासाठी त्याने मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे.