ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीतच नव्हे तर हिंदी सृष्टीने देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सुनील शेंडे हे विलेपार्ले येथे आपल्या घरी पत्नी, मुलं आणि नातवंडासोबत राहत होते. रात्री अचानक चक्कर येऊन पडल्याने शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्राव झाला आणि यातच त्यांचे निधन झाले. अनेक दर्जेदार भूमिका साकारणारा हा कलाकार कालांतराने अभिनय क्षेत्रापासून बाजूला झालेला पाहायला मिळाला. गेल्या पाच ते सात वर्षांपासून या क्षेत्रातून काढता पाय घेण्याचे त्यांनी ठरवले होते. अर्थात हा निर्णय घेण्यामागेही तसेच काही खास कारण होते.
सुनील शेंडे यांची सून जुईली शेंडे या राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण राजकारणात प्रवेश करतो हे कळल्यावर त्यांनी आपल्या सुनेला पाठिंबा दर्शवला होता. सून म्हणून नाही तर अगदी आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी तिच्यावर वडिलांसारखे प्रेम दिलं होतं. सुनील शेंडे यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय का घेतला याचेही कारण जुईलीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. सुनील शेंडे यांच्या निधनाने जुईली खूपच भावुक झाल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी म्हटले आहे की, सुनील शेंडे गेले. खरं आहे का? असं विचारणारे बरेचसे फोन मला सकाळपासून आले. हल्ली कशावर विश्वास ठेवायचा हे कळतच नाही म्हणून विचारून कन्फर्म करतोय, असं सांगणारी समोरची माणसं. पण खरंच विश्वास न बसण्यासारखी बातमी.
सुनील शेंडे उर्फ डॅडी हे खरं तर माझे सासरे पण त्यांच्या बायको आणि मुलांपेक्षा त्यांनी माझ्यावर जास्त प्रेम केलं हे ते सर्व पण मान्य करतील. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा ते मला विचारायचे. छोटी छोटी फेसबुक पोस्ट सुद्धा मला वाचून दाखवायचे. माझ्या हजार दगडांवर पाय ठेवण्याचं भारी कौतुक होत त्यांना. स्वतःच्या बायकोला नोकरी न करू दिलेले ते. मी राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय सहज मान्य केला त्यांनी. फक्त आणि फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटी. एके काळी दिवसाला अख्ख पनामा पाकिट ओढणारे ते हल्ली दिवसाला एक पुरवायचे. पण मला हक्काने सांगायचे की जरा घेऊन येशील का ग पाकिट. मी म्हणायचे डॅडी तो नाक्यावरचा दिनेश शेट्टी म्हणणार आहे की शेंडेंची सून हल्ली आईस बर्स्ट ओढायला लागली वाटतं. मग एक ऍक्टिंगचा खुन्नस द्यायचे.
हल्ली एक पुरते ग मला असं म्हणाले की मलाच मनात कुठेतरी खुट्ट व्हायचं. कशाला एवढा कंजूस पणा हा माझा प्रश्न. ते म्हणायचे एवढीच गरज आहे. खूप साऱ्या आठवणी. खूप साऱ्या गोष्टी. पाच सात वर्षांपूर्वी आता मी एक्टिंग करणार नाही अस एक दिवस जाहीर करून टाकलं. म्हणाले, हि हल्लीची मुलं सारखं ऑडिशन द्या असं पाठी लागतात, कुठेतरी पटत नाही ग. एवढं काम मी केलं. त्याच्यातलच एखादं काम बघा की, काही गोष्टी नाही पटायच्या त्यांना. पटल्या नाहीत त्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत. लग्नाआधी अट्टल नॉनव्हेज खाणारी मी. लग्नानंतर घरात माझी आई आहे आणि अंड पण शिजवलेलं मला चालणार नाही असं सांगणारे ते. जेव्हा एक नात झाली तेव्हा म्हणाले अंड लहान मुलांच्या तब्येतीला चांगलं असतं, देत जा तिला मध्ये मध्ये एखादं.
माझ्या दोन्ही मुलांना त्यांच प्रचंड प्रेम मिळालं. एरवी अतिशय कठोर वाटणारा माणूस गाणं गाऊन माझ्या लेकीला झोपवायचा असं कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. जरी काही सिरीयल्स आणि काही मुव्हीज साठी त्यांना प्रसिद्धी मिळाली तरी त्यांनी खूप सारं, वेगवेगळ्या धाटणीचं, अप्रतिम काम केलं. एक दोन चित्रपटांसाठी लक्षात न राहता त्यांनी केलेल्या शेकडो चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठी सुद्धा त्यांचं नाव लक्षात राहावे. एखाद्या अभिनेत्यासाठी त्यांनी केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवणं यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असू शकते? बाबा तुम्ही कायम आठवणीत राहणार आहात. मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तुमची लाडकी, जुईली.