मराठी सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की या सोहळ्याला एक ग्लॅमर चढलेलं पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकाराचं लग्न म्हटलं की त्या लग्न सोहळ्याचा थाट कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाला आता १० ते १२ दिवस झालेले आहेत, मात्र लग्नानंतरही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये टिकून आहे. कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे गेल्या काही दिवसांपासून याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रिवेडिंगचे फोटो शेअर केल्यानंतर सुमित पुसावळे मोनिका महाजन सोबत आज १४ डिसेंबर रोजी विवाहबद्ध होत आहे.
लग्नसोहळ्याची तारीख त्याने अगोदरच जाहीर केलेली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या पूर्वतयारीसाठी लगबग चालू होती. मालिकेतून ब्रेक घेऊन सुमित त्याच्या दिघींची गावी पोहोचला होता. काल १३ डिसेंबर रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे सकाळी त्यांचा साखरपुडा पार पडला. संध्याकाळी हळदीचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी लागीरं झालं जी मालिकेतील किरण गायकवाड, महेश जाधव सह अन्य कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील कोमल मोरे, वंदना पांचाळ, वैभव राजेंद्र, रोहित देशमुख आदि कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आज सकाळपासूनच सुमितचा नवरदेवाच्या गेटअपमधला फोटो व्हायरल झाला आहे.
सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. दिघींची गावचा सुपुत्र चंदेरी दुनियेत नाव लौकिक करत असल्याने त्याच्या गावकऱ्यांना सुमितचा अभिमान आहे. खूप कमी वेळातच सुमितने आपल्या सहजसुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. बाळू मामांवरील श्रद्धा त्यांच्यावरचं असलेलं प्रेम आपल्याला या भूमिकेमुळे मिळालं म्हणून तो या प्रेक्षकांचा कायम ऋणी राहिला आहे. खरं तर लागीरं झालं जी या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला होता. यात तो विरोधी भूमिकेत दिसला होता.
मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुमितला लहान मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. मात्र बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. मोनिका सारखी सुसंस्कृत, सुशिक्षित आणि समजूतदार मुलगी पत्नी म्हणून लाभायला भाग्य लागतं. असं म्हणणारा सुमित सध्या लग्नसोहळ्याच्या उत्साहात हरखून गेला आहे. हा धामधुमीनंतर लवकरच तो मालिकेत पुन्हा रुजू होईल असेही त्याने म्हटले आहे. सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.