साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे सुधा मूर्ती यांच्याबाबत म्हटले तर वावगे ठरायला नको. एक उत्कृष्ट प्राध्यापिका, थोर समाजसेविका उत्तम लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा अशी त्यांची ओळख आहे. येत्या शनिवारी १८ जून रोजी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटक राज्यातील शिगगावचा, एका उच्चशिक्षित पण मध्यमवर्गीय अशा कुलकर्णी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या सुधा मूर्ती यांनी शालेय शिक्षणात आपल्या हुशारीपणाची चुणूक दाखवून दिली होती.

सुधा मूर्ती यांचे वडील डॉक्टर कोल्हापूर येथे कार्यरत होते. मुलीने डॉक्टर व्हावे अशी त्यांची ईच्छा होती, तर गणित चांगलं असल्याने आईने गणित विषयातून एमएससी करण्यास सुचवले. तुझ्या मुलांना देखील पुढे जाऊन तुला शिकवता येईल हा पर्याय सुचवला होता. परंतु सुधा यांना इंजिनिअरिंगची आवड होती. इंजिनिअरिंग केलेल्या मुलींना लग्नासाठी स्थळ मिळणार नाही अशी त्यांच्या आज्जीची विचारधारा होती. परंतु आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या सुधाजींनी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. कॉलेजमध्ये असताना चटईवर झोपणे, थंड पाण्याने अंघोळ करणे, वाईट विचार येऊ न देणे हे त्यांच्या अंगवळणी पडले होते. ज्या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता तिथे त्या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या.

कॉलेजमधली एकमेव मुलगी म्हणून त्यांना अनेकजण प्रेमपत्र लिहीत असत. मात्र ही सगळी प्रेमपत्र त्या वडिलांकडे सुपूर्त करत. आजही ही सर्व मित्रमंडळी त्यांच्या संपर्कात आहेत असे ते आवर्जून सांगताना दिसतात. इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुण्यातील टेल्को कंपनीत पहिली महिला अभियंता म्हणून काम पाहिले होते. काही काळ त्यांनी पुण्यातील कॉलेजमध्ये आणि बंगलोर येथे विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी केली होती. नारायण मूर्ती यांच्यासोबत त्यांनी आपला संसार थाटला त्यावेळी नारायण मूर्ती यांना कुठलीही नोकरी नव्हती. मुलीच्या जन्मानंतर नारायण मूर्ती यांनी नोकरी सोडून इन्फोसिस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

परंतु सुधा मूर्ती यांच्या चुलत भावाने वाण्याचे दुकान सुरू केले होते त्यात त्याचे मोठे नुकसान झाले होते. म्हणून हातात चांगली नोकरी असताना बिजनेस करणे साशंक वाटत होते. परंतु नवऱ्याने समजूत घातल्यावर त्या व्यवसाय क्षेत्रात येण्यास तयार झाल्या. त्यावेळी हा बिजनेस एवढी मोठी झेप घेईल याची कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. आज त्या करोडोंच्या मालकीण आहेत पण सुधा मूर्ती यांचे साधे राहणीमान खूप काही सांगून जाते. समाजात त्यांनी इतकी दुःख बघितली आहेत त्यामुळे पैशांप्रती त्यांची आसक्ती निघून गेली आहे. दानधर्म असो किंवा सामाजिक कार्य अशा विविध उपक्रमातून त्या नेहमीच सक्रिय असतात. याचमुळे त्या सर्वसामान्यांच्या आदर्श मानल्या जातात.
अस्तित्व, आजीच्या पोतडीतली गोष्ट, आयुष्याचे धडे गिरवताना, तीन हजार टाके, गोष्टी माणसांच्या, महाश्वेता, बकुळा, पितृऋण, वाईज अँड अदरवाईज, दोन शिंगे असलेला ऋषी अशा कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे असंख्य वाचक मंडळी आहेत. त्यामुळे एक लोकप्रिय लेखिका अशीही त्यांनी ओळख जपली आहे. कोण होणार करोडपतीच्या मंचावर त्यांच्या आयुष्यातले आणखी काही पैलू उलगडताना दिसणार आहेत. त्यामुळे शनिवारच्या या विशेष भागाची आतुरता शिगेला पोहोचली आहे.