अभिनय क्षेत्र आणि राजकारण यांचा दुरान्वये सबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून आणि आपली एक बाजू मांडता यावी म्हणून कलाकार मंडळी राजकारणाबद्दल नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अशीच एक प्रतिक्रिया सुबोध भावे यांनी दिली होती. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘लायकी नसलेल्यांच्या हाती आपण देश दिला’ असल्याची खंत सुबोध भावे यांनी व्यक्त केली होती. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर आणि वृत्त माध्यमातून चांगलेच व्हायरल झाले होते.
मात्र हे वक्तव्य अर्धवट असल्याचे सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढल्याने त्यांनी वृत्त माध्यमांना चांगलेच धारेवर धरले आहे. काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. कुठेही कट न करता जसाच्या तसा. आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो.
पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा’ असे त्यांनी वृत्त माध्यमांना स्पष्ट शब्दात सुनावले आहे. शाळेच्या कौतुक समारंभात सुबोध भावे म्हणाले होते की, ही संस्था लोकमान्य आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केली होती. त्यामुळे या संस्थेमधून पुढची पिढी संस्कारक्षम घडेल. स्नेहसंमेलनात हिंदी मराठी चित्रपट गीतांवर नृत्य करणं. हिरोचे डायलॉग खांदे वाकडे करत म्हणणं यापेक्षा आपल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांशी ओळख करून देण्याचं काम या शाळेने, संस्थेने केलं आहे. तेव्हाच्या तरुण मुलांमध्ये देशाच्या भवितव्याबाबत चर्चा केली जायची. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश कसा असला पाहिजे, देशात काय काय असलं पाहिजे याचा ते विचार करत होते.
आज आपण ह्या गोष्टीचा खरंच विचार करतो का? आपण देश चालवण्याचं काम ज्यांची लायकी नाही अशा लोकांच्या माथी सोपवून आपण मोकळं झालोत. असे या भाषणात ते स्पष्ट म्हणाले होते. म्हणजे आजच्या घडीला राष्ट्रपुरुषांशी तुलना कोणत्याच राजकीय नेत्यांशी होऊ शकत नाही एवढेच त्यांचे म्हणणे होते. यावर चाहत्यांनी त्यांच्या या भाषणावर सहमती दर्शवली आहे. तुम्ही जे बोलले ते बोलायला देखील खूप धाडस लागतं असे मत मांडले आहे. तर काही जणांनी जनमनातली खडखद बोलून दाखवली त्याबद्दल सुबोध भावे यांचे धन्यवाद मानले आहेत.