लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवरायांच्या अष्टकापैकी चार चित्रपट प्रदर्शित झाले त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता यातील पाचवा चित्रपट म्हणून सुभेदार चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लागली हळद हे चित्रपटातील आणखी एक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात छोट्या रायबाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
चित्रपटातील रायबाच्या भूमिकेत असणाऱ्या बालकालाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ही भूमिका साकारली आहे बालकलाकार अर्णव प्रद्योत पेंढारकर याने. अर्णव पेंढारकर याला शिवकालीन युद्धकला अवगत आहे. कारण घरातूनच त्याला याचे प्रशिक्षण मिळाले असे म्हणायला हरकत नाही. सुभेदार हा अर्णवने अभिनित केलेला दुसरा चित्रपट आहे. त्याअगोदर तो हर हर महादेव चित्रपटात बाजी प्रभूंच्या बालभूमिकेत पाहायला मिळाला होता. ही भूमिका पुढे शरद केळकरने निभावली होती. अर्णवचे आईवडील प्रद्योत पेंढारकर आणि अर्चना पेंढारकर हे दोघेही शिवकालीन युद्ध कला शिकवण्याचे काम करतात. शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंचच्या माध्यमातून काठी, तलवार, दांडपट्टा, भाला अशा शिवकालीन युद्ध कलेचे ते प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.
प्रद्योत पेंढारकर हे हस्तरेषा आणि अंकशास्त्र तज्ञ आहेत. निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकत राजवारसा या संस्थेतून सापळा, केस ९९ हे चित्रपट बनवण्यात आले होते. तर दिग्पाल लांजेकर यांच्या शेरशिवराज आणि सुभेदार या चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच संस्थेतर्फे गेले दशकभर शिवकालीन युद्धकलेचे धडे देणारी प्रशिक्षण संस्था ते चालवत आहेत. हर हर महादेव आणि पावनखिंड या चित्रपटासाठी कलाकारांना युद्धकलेचे धडे शिकवण्याची संधी त्यांच्या संस्थेला मिळाली होती. अर्णवने देखील ही युद्धकला आत्मसात केली आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटातून त्याच्या कलागुणांना चांगला वाव मिळत आहे. रायबाच्या भूमिकेतून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकत आहे.