दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कलाकार मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काल मोठ्या दिमाखात चित्रपटाच्या ट्रेलरचा लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे अशा कलाकारांनी हजेरी लावली होती.
अवघ्या १६ तासांत चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. एका दिवसाच्या आत भारतातून या चित्रपटाचा ट्रेलर तब्बल ५ लाख लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा ट्रेलर ट्रेंडिंगच्या बाबतीत नंबर एकवर जाऊन पोहोचला आहे. मराठी भाषेतील चित्रपटाला मिळणारा हा सर्वात वेगवान ट्रेलर ठरला असल्याने देशभरातून त्याचं मोठं कौतुक होत आहे. मावळं जागं झालं रं, आले मराठे आले मराठे ही सुभेदार चित्रपटातील तर प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवत आहेत. आले मराठे हे गाणं दिग्पाल लांजेकर यांनी अवघ्या ५ मिनिटातच लिहिलं आहे. देवदत्त बाजी यांनी या गाण्याला म्युझिक दिलं आहे. आले मराठे हे गाणं रॅप सॉंगमध्ये मोडतं. हे गाणं वाजलं की लोक आपोआप थिरकायला लागतात.
रक्तामधी उसळली ही गाण्याची पहिली ओळ देवदत्त यांच्या डोक्यात होती, रिथम तयार होता. तोपर्यंत दिग्पाल लांजेकर गाणं लिहितच होते. ५ च मिनिटांत हे गाणं लिहून पूर्ण झालं. आणि पुढच्या अर्ध्या तासात गाण्याचे सूर जुळत गेले. गाण्याची खासियत अशी की ज्या तालावर हे गाणं तयार झालं तेच फायनल करण्यात आलं, त्याला रिटेक सुद्धा घेतला नाही. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याअगोदरच या चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली आहेत. मात्र आता चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सुभेदार चित्रपटही प्रेक्षकांची पसंती मिळवणार असा शिक्कामोर्तब केला जात आहे.