स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर साल २००० ते २००४ पर्यंत “सोनपरी” ही हिंदी मालिका प्रसारित केली जात होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या मालिकेतून परीची भूमिका साकारली होती. आपल्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करणारी एखादी परी आपल्याला भेटावी अशी ईच्छा ही परी पाहून लहान मुलांमध्ये निर्माण झाली होती. मालिकेत फ्रुटीचे पात्र देखील तुफान हिट झाले होते. आज ही फ्रुटी ३१ वर्षांची झाली आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीत तिचे नाव एक अभिनेत्रीच्या रूपाने घेतलं जात आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
सोनपरी मालिकेतून फ्रुटीची भूमिका साकारली होती “तन्वी हेगडे” हिने. साधारण चार वर्षे चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आजकाल खूप कमी अशा मालिका बनत आहेत ज्यांनी लहानग्यांचे मनोरंजन केले असावे मात्र ९० च्या दशकातील अशा लोकप्रिय मालिकांची नावे काढली तर एक भली मोठी यादीतच तयार होईल. त्यात सोनपरी ह्या मालिकेचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. मालिकेत तन्वी सह बरेचसे मराठी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. आज मालिकेतली फ्रुटी ३१ वर्षांची होत आहे ती सध्या काय करते आणी कुठं असते याबाबत प्रेक्षकांना जाणून घ्यायची ईच्छा आहे. ११ नोव्हेंबर १९९१ साली मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी रसना बेबी काँटेस्टमध्ये तिने सहभाग दर्शवला होता तेव्हापासूनच तिला कलाक्षेत्राची ओढ लागली होती. दादर येथील व्ही एन सुळे हायस्कुलमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. तन्वीने सोनपरी या हिंदी मालिकेव्यतिरिक्त ‘शका लका बूम बूम ‘ या लोकप्रिय मालिकेतूनही भूमिका साकारली होती. या दोन्ही मालिकांमुळे तन्वी अबालवृद्धांत लोकप्रिय ठरली होती.
चाईल्ड आर्टिस्ट म्हणून नाव लौकिक केलेल्या तन्वीने जवळपास १५० हुन अधिक व्यावसायिक जाहिरातीतून काम केले आहे. विरुद्ध, गजगामीनी, वाह! लाईफ हो तो ऐसी, राहुल, पिता अशा बॉलिवूड चित्रपटातही ती झळकली पुढे तिने आपली पावले मराठी चित्रपट सृष्टीकडे वळवली. २०१६ सालच्या “धुरंधर भाटवडेकर” हा मराठी चित्रपट तिने अभिनित केला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. “अथांग”, “हक्क”, “शिवा” या आणखी काही मराठी चित्रपटातून ती नायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपली मुलगी मराठी सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करताना दिसत आहे हे तिच्या आई वडिलांसाठी मोठ्या कौतुकाची गोष्ट ठरत आहे तसे तन्वीच्या आईने मीडियाशी बोलताना सांगितले होते. एक बालकलाकार ते मराठी चित्रपट सृष्टीची नायिका असा तन्वीचा प्रवास खूपच प्रभावी ठरलेला दिसतो. तन्वीला यापुढेही असेच यश मिळत राहो हीच kalakar.info टीमतर्फे सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…