रमा राघव मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार आज विवाहबंधनात अडकली आहे. २८ डिसेंबर रोजी सोनल पवारने समीर पौलास्ते सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. गेल्या चार दिवसांपासून सोनलच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरू होती. मेंदीचा सोहळा आणि त्यानंतर तिचा हळदीचा सोहळा पार पडला. तर काल रात्री हळदीच्या सोहळ्या नंतर संगीत सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सोनल आणि समीरने गाण्यावर ठेका धरत उपस्थितीतांनाही थिरकायरला भाग पाडले.

आज सकाळपासूनच सोनल नव्या नवरीचा साज चढवायला सज्ज झाली होती. सोनलने तिच्या लग्नात राणी कलरची नऊवारी मुनीया पैठणी नेसली. तर समीर ने सफेद रंगाचा धोती कुर्ता परिधान केला होता. सोनलच्या या लग्नाचे काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या दोघांवरही सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सोनल पवार हिने तुला पाहते रे या मालिकेतून नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. सोनल ही फार्मसिस्ट आहे. शिक्षण झाल्यानंतर काही काळ तिने फार्मसिस्ट म्हणून काम केले होते. पण अभिनयाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अस्मिता या मालिकेतून तिला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

या मालिकेतूनच तिचे अभिनय क्षेत्रात पाउल पडले होते. घाडगे अँड सून, सरस्वती, बॉस माझी लाडाची, लाडाची मी लेक गं अशा लोकप्रिय मालिकांमध्ये सोनलने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तर समीर पौलास्ते हा देखील मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या समीरने विठ्ठला तूच, वेगळी वाट, चंद्रमुखी, ये रे ये रे पावसा अशा चित्रपटासाठी मार्केटींगचे काम केले आहे. सोनल आणि समीरच्या लग्नानिमित्त त्यांच्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी सोनल आणि समीरला खूप खूप शुभेच्छा.