बाईपण भारी देवा या चित्रपटाची ग्रँड सक्सेस पार्टी नुकतीच साजरी करण्यात आली. या चित्रपटातील कलाकारांनी गाण्यावर ठेका धरत पार्टीची रंगत वाढवली. मौज मजामस्ती करत कलाकारांनी अनुभवलेले धमाल किस्से इथे शेअर केले. बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांनी अजूनही उचलून धरलेला आहे. अगदी ज्या महिला कधीच चित्रपट गृहात गेल्या नाहीत त्यांनी सुद्धा हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाचे शूटिंग मागील दोन तीन वर्षात पार पडले होते. तेव्हा शरद पोंक्षे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच अवघ्या एक महिन्यातच त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग केले होते.
केमोथेरपीच्या त्रासदायक प्रकियेनंतर त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. त्यामुळे चित्रपटातील भूमिकेला हवा तसा लूक त्यांना मिळाला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर मी असंख्यवेळा रडलोय अशी प्रतिक्रिया शरद पोंक्षे यावेळी देतात. तर याच मंचावर सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाला केदारने एक प्रश्न विचारला. सुचित्रा सेटवर मेकअप करायचाच का? असं म्हणून केदारला ती कित्येकदा टाळत होती. तेव्हा सुचित्रा घरी कशी वागते याबद्दल सोहमला विचारण्यात आले, तेव्हा सोहम त्याचे मजेशीर उत्तर देतो. “आईच्या आवाजाला फीडबॅक देणारा मीच एकटा होतो, त्यामुळे माझं या चित्रपटासाठी कास्टिंग झालेलं आहे. कारण बोलताना खूपजण घाबरतात. माझ्या घरी माझे फ्रेंड आले की साधारण घरात वाघ बिघ बांधलेला असल्याचा फिल असतो.
माझे फ्रेंड बाबांना हाय हॅलो करतात, काका कसे आहात? आणि काकू आहेत का घरात? असं हलक्या आवाजात विचारतात. माझ्या मित्रांनी आयुष्यात न खाल्लेल्या पालेभाज्या किंवा काहीही अगदी चवळीची उसळ माझ्या घरी खाल्लेली आहे. कारण आईला जर कळलं की भाजी नाही आवडली. तर मित्र लगेचच म्हणतात की, नाही नाही काकू सॉलिड झालीये भाजी. असं असल्यामुळे मी तुझ्या प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकत.” हे बोलल्यावर केदार शिंदे त्याला खुणावत म्हणतो की पाठीमागे आई उभी आहे तिकडे बघ. “मी तिकडे बघणारच नाही माझं ठरलंय एवढं बोलून झालं की मी डायरेक्टर इथून निघून जाणार आहे”. सोहम बांदेकरच्या या मजेशीर प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.