काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्मिता तांबे हीला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. २०१९ साली स्मिता ही रंगभूमी तसेच बॉलिवूड अभिनेता धीरेंद्र द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. स्मिताच्या घरी तिच्या मैत्रिणींनी जाऊन तिचे डोहाळजेवण साजरे केले होते त्यावेळी अभिनेत्री अदिती सारंगधर, फुलवा खामकर, रेशम टिपणीस यांनी ‘कुणी तरी येणार येणार गं…’ या गाण्यावर ठेका धरला होता. स्मिताच्या डोहळजेवणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला होता.
स्मिता आणि धिरेंद्र यांना कन्यारत्न प्राप्ती झाली. नुकतेच तिच्या लाडक्या लेकीचे बारसे देखील साजरे करण्यात आले. स्मिताच्या मुलीचे नाव आहे “वैदिका”. वैदिका या नावाचा अर्थ देखील खूपच सुरेख आहे. वैदिका या नावाचा अर्थ आहे ज्ञान, अप्सरा, बुद्धीची देवता. स्मिताने सांगितलं की हे नाव तिच्या नवऱ्याने धिरेंद्रने सुचवलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने स्मिताला कन्यारत्न प्राप्तीच्या शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. सुमित्रा भावेंच्या एका शॉर्टफिल्म मध्ये एक स्त्री गर्भार राहते त्यावेळी तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं अशी कल्पना करून त्याने एक कविता लिहिली होती. स्मिता आणि तिची मुलगी वैदिका हिला ती कविता अर्पण केली. जितेंद्र जोशीने आपल्या या कवितेतून माय लेकीच्या नात्याचे भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. या कवितेबद्दल स्मिताने त्याचे आभार देखील मानले आहेत.
७२ मैल एक प्रवास, जोगवा, नाती गोती, गणवेश, लाडाची मी लेक गं, सावट, परतू अशा दर्जेदार चित्रपटातून स्मिताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सिंघम रिटर्न, डबल गेम, पंगा, सेक्रेड गेम्स२ अशा हिंदी चित्रपटातूनही तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या. झी मराठीवरील लाडाची मी लेक गं या मालिकेतूनही तिने आपल्या अभिनयाचा दरारा कायम राखून ठेवला. लग्नानंतर उत्तर भारतात असलेल्या स्मिताच्या सासरी स्मिताचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. लग्नानंतर स्मिताने पहिल्यांदाच तिच्या घरी गौरिंचे पूजन देखील केलेले पाहायला मिळाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मिता सासरकडच्यांचे आणि तिथल्या संस्कृतीचे नेहमीच कौतुक करताना दिसते.