मराठी अभिनेत्री याच क्षेत्रावर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही आपला जम बसवू पाहत आहेत. मराठी सृष्टीत आहि एक अभिनेत्री आहे जिने हॉटेल व्यवसायच नाही तर सलून आणि पर्यावरण पूरक कारखाने देखील सुरू करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. ही अभिनेत्री आहे सिया पाटील. सिया पाटील हिने अभिनय क्षेत्रात तर जम बसवलाच पण आता उद्योग क्षेत्रातही ती गगन भरारी घेताना दिसत आहे. सिया पाटील हिने काही वर्षांपूर्वी कांदिवली पश्चिम, मुंबई येथे S Sense salon and spa सुरू केले होते. त्यानंतर चांदीवली स्टुडिओजवळच ‘गाव curry चव महाराष्ट्राची’ नावाने पहिले हॉटेल सुरू केले.
हॉटेल व्यवसायात भरभराट होत असलेली पाहून सियाने गेल्याच वर्षी तवस रेस्टॉरंट नावाने दुसरे हॉटेल सुरू केले. आता सियाने चक्क बारामतीमध्येच स्वतःचे दुसरे सलून थाटलेले पाहायला मिळत आहे. मुंबई नंतर तिची S Sense सलूनची ही दुसरी शाखा आहे. मुक्ती विंग्स, एमआयडीसी बारामती इथे तिने ही ब्रांच सुरू केली आहे. त्यामुळे सियाचे व्यवसाय क्षेत्रातील हे यश दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालले आहे. सिया फक्त हॉटेल आणि सलून व्यवसायातच कार्यरत आहे असे नाही. तर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेही तिने एक कारखाना सुरू केला आहे. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे Shion Green Energy हा व्यवसाय तिने सुरू केला होता. शेतातील माल विकल्यानंतर राहिलेला पालापाचोळा, कचरा तिच्या कारखान्यात आणला जातो.
कच्च्या मालापासून विटा बनवल्या जातात. या विटा पर्यावरण पूरक असल्याने कोळसा आणि लाकूड ऐवजी या विटांचा जाळण्यासाठी वापर केला जातो. छोट्या मोठ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायात अशा विटांना मागणी असते. या व्यवसायातून शेतकऱ्यांना देखील आर्थिक लाभ व्हावा हाच यामागचा तिचा मुख्य हेतू होता. सियाने अभिनय क्षेत्रात प्रवेश देखील असाच केला होता. गाव सोडून पुण्यात राहायला आलेल्या सियाने आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी क्लासेस घेतले होते. शिवाय पेट्रोल पंपावरही तिने काही काळ काम केले होते. हाताला यश मिळत गेले तसे सियाचे व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण झाले. गेल्या काही वर्षांपासून सिया व्यवसाय क्षेत्रात जोमाने झेप घेताना दिसत आहे. तिच्या या नाविन्यपूर्ण व्यवसायाला भरभराटी येवो हीच एक सदिच्छा.