गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. ही फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन वेळोवेळी मदत करत आहे. सोबतच सतर्क राहण्याचेही आवाहन केले जात आहे. अशीच सतर्कता सिद्धार्थ जाधवने सुद्धा दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिध्दार्थने त्याच्या घराचे लाईटबिल भरले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळीच सिद्धार्थला भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाकडून पत्राद्वारे एक नोटीस मिळाली. ती नोटीस दिसायला अगदी अधिकृत असावी अशी दिसत होती. मागील महिन्याचे लाईटबिल भरले नाही असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले होते.
सोबतच एक हेल्पलाईन नंबर त्यात देण्यात आला होता. या नंबरवर संपर्क साधावा असे त्यात नमूद केले होते. ही नोटीस पाहूनच सिध्दार्थला थोडी शंका आली. ‘माझ्या घरी बेस्ट कडून वीजपुरवठा होतो. मग मला थेट विद्युत मंत्रालयाकडून का नोटीस यावी? नोटिसवर भारत सरकारची अधिकृत नाममुद्रा होती. मात्र त्यावर असलेली स्वाक्षरी खोटी होती हे माझ्या लक्षात आलं. शिवाय मी दोन दिवसांपूर्वीच लाईटबिल भरलेलं होतं. त्यामुळे मला ही फसवणूक वाटली आणि मी लगेचच मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. माझा पोलीस खात्यात अधिकारी मित्र आहे त्याला मी ही सर्व माहिती दिली. तेव्हा प्राथमिक तपासात ही फसवणूक असल्याचे सांगण्यात आले. आज हे माझ्याबरोबर घडलं उद्या कदाचित माझ्या चाहत्यांसोबत हे घडू शकतं अस होऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करतो.
ही मी माझी जबाबदारी मानतो. ज्येष्ठ नागरिक अशा फसवणुकीच्या प्रकरणात अडकू शकतात. अनावधानाने रोजच्या गडबडीत आपण असे फोन कोणालाही करतो. आणि कुठलीही शहानिशा न करता आपली वैयक्तिक माहिती ऍपमध्ये भरतो. यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते’. दरम्यान ह्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत असे पोलिसांनी म्हटले आहे. फसवणूक करणारे लोक व्हाट्सएपच्या माध्यमातून अशा नोटीस पाठवू लागले आहेत. रात्री वीज कट करण्यात येईल असे त्यात लिहिले जाते. दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यानंतर ग्राहकांना एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. यातूनच तुमची खाजगी माहिती उघड होते आणि ह्याकर्सकडून आर्थिक फसवणूक केली जाते.