आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात राेजच्या धावपळीनंतर रिचार्ज हाेणे खूप गरजेचे असते. या रिचार्जसाठी गरजेचे असते ते घर. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा यांच्या नाजूक धाग्यांनी विणलेली ती एक कलाकृती असते. त्यात रूक्षता नसते, मायेचा ओलावा असतो. पण या मायेबरोबरच काही भौतिक गोष्टींनीही घर सुंदर बनते. मग भले ते घर भाड्याचे जरी असले तरी त्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून जाते. आपल्या स्ट्रगलच्या काळात अनेक कठीण प्रसंगातून पुढे जात असताना ज्या घरात आल्यावर मनाला सुख, समाधान मिळते त्या घराला निरोप देण्याची वेळ येते. तेव्हा तो प्रसंग तितकाच कठीण वाटायला लागतो.

असाच काहीसा प्रसंग सिद्धार्थ चांदेकरला देखील अनुभवायला मिळाला आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली गोरेगाव फिल्मसिटीजवळ एका भाड्याच्या घरात राहत होते. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी मुंबईत स्वतःचं नवीन घर खरेदी केलं आहे. त्यामुळे आता या भाड्याच्या घराला निरोप देण्याची वेळ आली आहे. सिद्धार्थसाठी हे घर भाड्याचे जरी होते तरी त्याच्या अनेक आठवणी तो सोबत घेऊन जात आहे. या घरातूनच सिध्दार्थने आरे जंगलातील बिबट्यांची झलक दाखवून दिली होती. मिताली सोबत केलेल्या अनेक गमती जमती याच घराचा एक भाग बनल्या आहेत. त्यामुळे हे घर सोडून जाताना मी इथल्या अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे असे तो भावनिक होऊन म्हणतो.

घर सोडून जाताना सिध्दार्थची झालेली घालमेल त्याच्याच शब्दात जाणून घेऊयात. ‘तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी, स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय’.
‘ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा, नीट राहूदे, प्रेम’ असे म्हणत सिध्दार्थने या घराला निरोप दिला आहे. त्याच्या या भावुक पोस्टवर एका चाहत्याने तू जिथे जाशील ती जागा आनंदाने उत्साहाने भरून टाकशील असा गोड प्रतिसाद दिला आहे. तर अमृता खानविलकरने नवीन घरासाठी आणि नवीन आठवणींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.