मराठी मालिका सृष्टीतील लग्नसोहळ्याचा थाट पाहण्यासारखा असतो. एक दोन दिवस नाही तर अगदी आठवडाभर हे सोहळे मालिकेतून साजरे केले जातात. झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याचा विशेष सप्ताह प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अक्षराने तिच्या साखरपुड्याच्या दिवशी लाल पांढऱ्या रंगांची साडी नेसलेली आहे. खरं तर अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिची ही इच्छा या मालिकेतून पूर्ण झाली आहे. असे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.
शिवानीला तिच्या लग्नात पांढऱ्या लाल रंगाची साडी नेसायची होती, पण यासाठी तिच्या आईने नकार दिला होता. शिवानी आणि विराजसचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने पार पडले होते. त्यामुळे लग्नातले त्यांचे पोशाख दाक्षिणात्य पद्धतीचे होते. शिवानीला टू स्टेट्स हे पुस्तक खूप आवडतं. त्या पुस्तकात दिलेल्या पद्धतीनुसार आपलं लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती. मला माझ्या लग्नात पांढऱ्या लाल रंगाची साडी नेसायची होती पण ते काही जमलं नाही. पण आता साखरपुड्याच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊतने माझी ही इच्छा पूर्ण करून घेतली. जेव्हा मी ही साडी बघितली तेव्हा मी आईला म्हटले की बघ तू नाही म्हणालीस पण आता मालिकेमुळे माझी इच्छा पूर्ण झाली.
शिवानीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केला नव्हता डायरेक्ट त्यांनी लग्न केले होते. तिच्या लग्नात तिने एक अट ठेवली होती की, मी पाऊण तासात लग्नासाठी रेडी होईल पुन्हा मी साड्या बदलण्यात वेळ घालवणार नाही. कारण मला तो वेळ माझ्या कुटुंबाला द्यायचा होता . त्यामुळे आम्ही फक्त लग्न केलं होतं आणि पोशाखात सर्वांना एकच थीम देण्यात आली होती असे शिवानी सांगते. दरम्यान मालिकेनिमित्त शिवानीला सतत मेकअप करावा लागतो आहे आणि वेगवेगळ्या साड्या सुद्धा नेसाव्या लागत आहेत. पण हा एक सप्ताह विशेष एपिसोड असल्याने ते करावं लागतंय असे ती म्हणते.