झी मराठी वाहिनी आता दुपारच्या वेळेत सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्या दमाच्या मालिका घेऊन येत आहे. येत्या १३ फेब्रुवारी पासून दुपारी १२.३० वाजता यशोदा ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. साने गुरुजींना घडवणाऱ्या आई यशोदाची ही गोष्ट पाहायला प्रेक्षकांना निश्चितच आवडणार आहे. यशोदाच्या बालपणीच्या जडघडणात कोणा कोणाचा मोलाचा वाटा होता याचा उलगडा होत जाणार आहे. त्यामुळे झी मराठीच्या प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केलेले आहे. यशोदा मालिकेत अभिनेत्री कृतिका तुळसकर महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कृतिका सोबत आणखी कोण कोण या मालिकेत झळकणार आहे याचा उलगडा येत्या काही दिवसात होईल.
यशोदा मालिकेसोबतच झी मराठी वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होत आहे. दुपारी १ वाजता लवंगी मिरची या मालिकेतून प्रेक्षकांना फॅमिली ड्रामा अनुभवायला मिळणार आहे. लवंगी मिरची ही मालिका राधम्मा कुथुरू मालिकेचा रिमेक आहे. अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर तिच्यासोबत तन्मय जक्का हा नवखा कलाकार स्क्रीन शेअर करायला सज्ज झाला आहे. तन्मय जक्का हा अभिनेता तसेच दिग्दर्शक सुद्धा आहे. तन्मयने पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंगचे धडे गिरवले आहेत, मात्र नाटकांमधून तो काम करताना दिसला आहे. विनोदोत्तम करंडक, हौशी मराठी नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक अशा विविध नाट्यस्पर्धामधून त्याने अभिनय तसेच नाट्य दिग्दर्शनाचे काम केलेले आहे.
वंदे मातरम, सावराया ये आता, सजीव निर्जीव अशा प्रोजेक्टसाठी त्याने अभिनय तसेच दिग्दर्शनाचे काम केले आहे. २०२१ साली महाराष्ट्रज सुपर मॉडेलचा किताब त्याने पटकावला होता. लवंगी मिरची या मालिकेतून प्रथमच तन्मय छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आपल्या पहिल्याच मालिकेत शिवानी बावकर सोबत दमदार भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. शिवानी बावकर हिने झी मराठीवरील लागीरं झालं जी या मालिकेत सुद्धा अशाच धाटणीची भूमिका निभावली होती. प्रेक्षकांना तिची शितलीची भूमिका विशेष भावली होती. आता शिवानीचा लवंगी मिरचीचा ठसका पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शिवानी बावकर आणि तन्मय जक्का या दोन्ही कलाकारांना नवीन मालिकेसाठी शुभेच्छा.